लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे जालन्याचे उमेदवार कल्याण काळे आणि औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मविआच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. शरद पवार म्हणाले, मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला बेरोजगारी कमी करण्याचं, महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, त्यांना या गोष्टी करता आल्या नाहीत. ते म्हणाले होते, स्वयंपाकाच्या गॅसची किंमत कमी करू, पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५० टक्क्यांनी कमी करू. मात्र या वस्तूंच्या किंमती कमी होण्याऐवजी वाढल्याचं आपण पाहतोय. मोदींना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रित करता आल्या नाहीत.
शरद पवार म्हणाले, आपल्या देशातील बेकारांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) जगभरात सर्वेक्षण करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतात जेव्हा १०० मुलं कॉलेजमधून शिकून बाहेर पडतात, त्यापैकी ८७ मुलं बेकार आहे. म्हणजेच देशात ८७ टक्के बेकारी आहे. त्याच देशाचे पंतप्रधान या तरुणांचा भवितव्याचा विचार करत नसतील तर त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. मुळात हा प्रश्न देशातील तरुणांनी उपस्थित केला पाहिजे.
आपल्या महाराष्ट्रातही गंभीर परिस्थिती आहे. राज्यावर भीषण दुष्काळाचं संकट ओढवलं आहे. जनावरांना चारा नाही. यातून हे सकार आपल्याला कसं बाहेर काढणार याबाबत कोणीही चकार शब्द काढलेला नाही. मला आठवतंय, मी देशाचा कृषीमंत्री असताना आपल्या राज्यात दुष्काळ पडला होता. तेव्हा मी औरंगाबादला आलो होतो. दुष्काळामुळे मोसंबीची पिकं जळत होती. तेव्हा आमच्या सरकारने मोसंबीच्या बागांना पाणी देण्यासाठी आर्थिक तरतूद केली आणि त्या बागा वाचवल्या. मोसंबी पिकवणारा शेतकरी त्या संकटातून बाहेर आला. एखादा शेतकरी मोठ्या कष्टाने बाग उभी करतो. तो पूर्णपणे त्या बागेवर अवलंबून असतो. मात्र पाण्याअभावी बाग जळून गेली तर त्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. त्याच शेतकऱ्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आपल्या हातातली सत्ता वापरायची हे सूत्र राज्यकर्त्यांनी अवलंबलं पाहिजे. परंतु, सध्याच्या राज्यकर्त्यांना त्या शेतकऱ्यांची कसलीच चिंता नाही.
शरद पवार म्हणाले, ज्यांनी मोदी सरकारविरोधात आवाज उठवला, जे लोक त्यांच्याबरोबर गेले नाहीत त्यांना या लोकांनी (भाजपा) तुरुंगात डांबलं आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना (अरविंद केजरीवाल) तिहार तुरुंगात टाकलं आहे. पश्चिम बंगालमधील मंत्री तुरुंगात आहेत. पंजाबमधील मंत्री तुरुंगात आहेत. लोकांचे अनेक प्रतिनिधी तुरुंगात आहेत. ही हुकूमशाही चालू आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून सहाय्य मिळत नाही. जे लोक यांच्या सरकारवर टीका करतील त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं जात आहे. हे राज्यकर्ते आपल्या देशाला हुकूमशाहीच्या मार्गावर नेत आहेत. ती हुकूमशाही तुमची आपली लोकशाही उद्ध्वस्त करून तुमचा आणि माझा अधिकार हिरावतील. आपल्याला लोकशाहीवरील, आपल्या राज्यघटनेवरील संकट दूर करायचं आहे. यासाठी त्यांना (भाजपा) उत्तर द्यावं लागेल. त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करणं गरजेचं आहे. या जालन्याच्या आणि औरंगाबादच्या मतदारसंघात तुम्हाला कल्याण काळे आणि चंद्रकांत खैरे यांना विजयी करावं लागेल.