Maharashtra Lok Sabha Election Exit Polls 2024: लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडल्यानंतर देशभरातील विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल काल (दि. १ जून) जाहीर झाले. या एक्झिट पोलच्या अंदाजावरून एनडीएला बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्याबाबतीतला कल स्पष्ट झालेला नाही. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे, त्यामुळे त्याचा फटका मतदानावर बसला असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान, यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही यावरून महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रासाठी Exit Poll चे अंदाज काय?
महाराष्ट्रात दोन्ही बाजूंकडून ४५ हून अधिक जागा मिळतील, असा दावा करण्यात आला होता. देशभरात एनडीएच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळं असल्याचं दिसून आलं आहे. एक्झिट पोल्सनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांना प्रत्येकी सरासरी २० ते २३ जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यातही भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्या, तरी एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटासाठी एक्झिट पोल्सचे अंदाज फारसे समाधानकारक ठरले नाहीत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी ९ ते १० जागांचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषकांसाठी हे अंदाज उत्सुकतेचा विषय ठरले आहेत.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
एक्जिट पोलनुसार देशभरात मोदीच पुन्हा पंतप्रधान पदी निवडून येणार असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजावर विजय वडेट्टीवारांनी शंका व्यक्त केली आहे. “सत्ताधाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे असे आकडे सांगितले जातात. जनतेचा राग संपूर्ण देशभरातून दिसत होता. परंतु, एक्झिट पोलनुसार जर निकाल आले तर नक्कीच काहीतरी गडबड आहे”, असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं. ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
VIDEO | Lok Sabha Elections 2024: "We will know on June 4. Exit poll predictions are just to please those who are in power. We have noticed disapproval among people (for the government) across the nation. If similar results come, then we will know that there is definitely… pic.twitter.com/XD8F1jyoib
— Press Trust of India (@PTI_News) June 2, 2024
तर, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. परंतु, अजित पवार गटाला शुन्य जागा मिळणार असल्याचंही या एक्झिट पोलनुसार अंदाज बांधण्यात आला आहे. तर राज्यात ठाकरे गट दुसरा मोठा पक्ष ठरणार असल्याचंही या एक्झिट पोलवरून स्पष्ट होतंय. यावरून वडेट्टीवार म्हणाले, “शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण आहे. शेती एकाची आणि पेरणाऱ्याने म्हणावं की माझी मालकी आहे. शेतकऱ्याने त्याची जमीन कसायला दुसऱ्याला दिली म्हणजे तोच मालक होत नाही. पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराक दिली असल्याचा अंदाज दिसतोय.”
चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया काय?
“राज्यात वेगवेगळे एक्झिट पोल आहेत. त्यातही एक दिशा अशी दिसतेय की ३५ च्या पुढे नक्कीच महायुती जाईल. एक्झिट पोल्सच्या अंदाजांवर काही बोलण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षात ४ तारखेला निकाल हाती येतील तेव्हा बोलू. सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागांसाठी मी पूर्ण ठाम आहे. आत्ता हे कल दाखवत असले, तरी महायुतीला महाराष्ट्रात खूप चांगल्या जागा मिळणार आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.