Karnataka Election 2023 : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याकरता सर्वच पक्षीयांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जाहीरनामे प्रसिद्ध झाले असून मतदारांना विविध आश्वासने देण्यात आले आहेत. दरम्यान, सत्तेवर आल्यास बजरंग दलावर बंदी आणू, अशी भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली होती. यावरून भाजपाने काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं. आता याहीपुढे जात काँग्रेसने हनुमान मंदिरांचा मुद्दा उचलून धरला आहे.
“सत्तेवर आल्यास आम्ही भगवान हनुमानाच्यान नावाने विशेष योजना सुरू करू. प्रत्येक तालुक्यात तरुणंच्या मदतीसाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम सुरू करू. म्हैसूर आणि बंगळुरूत २५ मंदिरे आहेत. भाजपा नेत्यांनी या मंदिरांची काळजी घेतली का?, असा प्रश्न काँग्रेसचे राज्य युनिट प्रमुख डी. के. शिवकुमार म्हणाले. तसंच, “पक्ष राज्यभरातील अंजनेय (हनुमान) मंदिरांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. अंजनाद्री टेकडीवर असलेल्या भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाचा विकास करण्यासाठी काँग्रेस अंजनाद्री विकास मंडळ तयार करणार आहे”, असंही ते म्हणाले.
“काँग्रेसने नेहमीच हनुमानाची भक्ती केली आहे. पंरतु देवाच्या नावाखाली संघटना स्थापना करून आम्ही कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. अशा शक्तींवर आम्ही कायदेशीर कारवाई करू. आम्ही आमच्या जाहीरनाम्यातच हे सांगितलं आहे. परंतु, भाजपाला हा मुद्दा भावनिक बनवायचा आहे”, असंही शिवकुमार म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मनीष तिवारी यांनी गुरुवारी सांगितले की, “मी दिवसातून दोनदा ‘हनुमान चालीसा’ चा जप करतो. परंतु भाजपा नेहमीच हनुमान चालीसा पठणावरून राजकारण करते.”
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. यावर माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “कोणत्याही संघटनांवर बंदी घालण्याचं काम राज्य सरकार करू शकत नाही. बजरंग दलावरही राज्य सरकार बंदी घालू शकत नाही. मी कायदा मंत्री असताना आमच्यासमोर असा कोणताही प्रस्ताव नव्हता”, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं.