NDA meeting for government formation : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज एनडीएच्या घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची आणि निवडून आलेल्या खासदारांची एकत्रित बैठक संसदेच्या केंद्रीय सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला संबोधित करत असताना मोदींनी सर्व मित्र पक्षांचे आभार मानले. “एनडीएच्या माध्यमातून चौथ्यांदा सरकार स्थापन होत आहे. हे सरकार आधीच्या सरकारपेक्षाही अधिक गतीने काम करेल”, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली.
यावेळी बोलत असताना खासदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखविणारे फोन येऊ शकतात, त्यांनी अशा खोट्या फोनला बळी पडू नये, असा सल्लाही मोदींनी दिला. ते म्हणाले, “तुम्ही टीव्हीवर पाहत असाल की, वेगवेगळी चर्चा घडवली जात आहे. काहीही बातम्या चालवल्या जात आहेत. हे लोक अशा बातम्या कुठून आणतात, हे मलाही कळत नाही. आता तर तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, माझ्या स्वाक्षरीचा वापर करून खोटी यादीही प्रसारित केली जाऊ शकते.”
‘एनडीएचं सरकार किती वर्ष टिकणार?’, नरेंद्र मोदी म्हणाले…
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “असेही होऊ शकते की, कुणाला तरी मंत्री बनवले जाईल. तसेच खात्यांचेही वाटप केले जाईल. या पद्धतीने अनेक लोक सरकार बनविण्याच्या उद्योग करत आहेत. मंत्री पद आणि खात्यांचे वाटप सुरू आहे. पण मी सांगू इच्छितो की, यात तसूभरही तथ्य नाही. त्यामुळे कुणाला जर मंत्रिपदासाठी फोन आलाच तर त्यांनी दहा वेळा त्याची खातरजमा करावी. फोन करणारा व्यक्ती खरंच कुणी पदावरील महत्त्वाची व्यक्ती आहे का? हे तपासून घ्या. नाहीतर कुणीतरी उगाच फोन फिरवून तुम्हाला मंत्री करून टाकेल.”
“मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ”; नितीश कुमारांचाही चर्चांना पूर्णविराम!
“सध्या फसव्या लोकांची मोठी फौज तयार झाली आहे. काही लोक स्वभावानुसार असे करत असतात, तर काहींना हे करण्यात आसुरी आनंद मिळतो. त्यामुळे माझी सर्व खासदारांना विनंती आहे की, त्यांनी अशा आमिषांना बळी पडू नये. आपण पाहिले की, इंडिया आघाडीचे नेते फेक न्यूजच्या बाबतीत आता तज्ज्ञ झाले आहेत. त्यामुळे ते लोक याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. आपल्याला अफवांपासून दूर राहण्याची गरज आहे. ब्रेकिंग न्यूजच्या आधारावर देश चालत नाही”, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.