सातारा : महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची अद्याप घोषणा झाली नाही. आमच्या आघाडीची घोषणा झाल्याने आम्ही निवडणुकीत आघाडी घेतली आहे. मी कोणत्याही महाविकास आघाडीसोबत नाही. मी आमच्याच आघाडीसोबत असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, राजू शेळके, धनंजय महामुलकर, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संदीप साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी वेल्डिंग करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक
राजू शेट्टी म्हणाले, की लाडकी बहीण योजनेतून बहिणींना किती दिवस पैसे मिळणार हे माहिती नाही. मात्र, बहिणीला १५०० रुपये द्यायचे आणि भावाचा खिसा कापायचा असा उद्योग सरकारने सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची घोषणा झाली नाही. आमच्या आघाडीची घोषणा झाल्याने आमचीच पहिली आघाडी आहे. मी कोणत्याही महाविकास आघाडीसोबत नाही. मी आमच्याच आघाडीसोबत आहे. आमच्याच आघाडीची राज्यात सत्ता येणार आहे. पंजाबमध्ये बदल होतो. दिल्लीत बदल होतो मग महाराष्ट्रात का नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर इतका खाली गेलेला आहे. सामान्य माणसांना या राजकारणी लोकांची किळस आलेली आहे. महाराष्ट्रातले राजकारण नेमके कुठे चालले आहे. राजकीय टोळी युद्द सुरू आहे. त्याचा त्रास सामान्य माणसाला होत आहे. सामान्य माणूस राजकारण्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा त्यांनी दिला.