Telangana Assembly Election 2023 : तेलंगणा राज्यात ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद येथे मागासवर्गीय समाजाची आत्म गौरव सभा घेतली. या सभेत त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपाची सत्ता आल्यास मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपद देण्यात येईल. “तेलंगणामध्ये भाजपाची सत्ता आल्यास मागासवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री केला जाईल. राज्यात बदलाचे वारे वाहू लागले आहेत”, असेही मोदी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहा दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घोषणा केली होती, त्यानंतर मोदींनीही याच मागणीवर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबाद शहरातील एलबी स्टेडियममध्ये झालेल्या सभेला हजारो लोकांची उपस्थिती होती. एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या जन सेना पार्टीचे (JSP) प्रमुख अभिनेते के. पवन कल्याण हे देखील मंचावर उपस्थित होते. मोदी आणि पवन कल्याण यांच्या सौहार्दाचे संबंध पाहता जेएसपीला तेलंगणामध्ये काही मतदारसंघ मिळू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. भाजपाने ११९ पैकी १०० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

हे वाचा >> Telangana : कल्याणकारी योजना विरुद्ध बेरोजगारी-लाचखोरी; तेलंगणच्या जनतेसमोर काय आहेत पर्याय?

मागासवर्गीय समाजातील मोठे नेते जसे की, करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार, निझामाबादचे खासदार अरविंद धर्मापुरी, मागासवर्गीय मोर्चाचे अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण आणि आमदार एटेला राजेंद्र हे नेतेही हैदराबादमधील सभेला उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, २०१३ साली याच ठिकाणी जाहीर सभा घेण्यासाठी मला निमंत्रित केले होते. भाजपाला पहिल्यांदाच या ठिकाणी विजय मिळाला होता. मला पंतप्रधान करण्यात आणि भाजपाची सत्ता स्थापन करण्यात येथील जनतेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मला खात्री आहे की, ज्याप्रकारे तुम्ही मला मंत्री केलेत, त्याचप्रकारे तेलंगणामध्ये मागासवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री होण्यातही तुम्ही सहकार्य कराल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण देऊन पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भाजपा हा एकमेव पक्ष आहे, ज्यांनी आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केले. भाजपाने १९९८ रोजी जीएमसी बोलायोगी यांच्या रुपाने दलित नेत्याला लोकसभेच्या अध्यक्षपदी संधी दिली.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (BRS) सरकारवरही मोदी यांनी टीका केली. बीआरएसला त्यांनी काँग्रेसची ‘सी’ टीम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, दिल्ली मद्य घोटाळ्यामध्ये बीआरएसच्या नेत्यांचा हात आहे. सरकारी नोकर भरतीच्या सर्व परीक्षांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता नेहमीची झाली आहे. तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TSPSC) परीक्षेचे पेपर लिक झाले, असे आरोप करून मोदी यांनी जनतेला डबल इंजिनचे सरकार निवडून देण्याचे आवाहन केले. बीआरएसने जनतेला लुटण्याचे काम केले, असे सांगताना मोदी म्हणाले की, आमचे सरकार सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत रेशन देणार आहे.

तेलंगणामध्ये १३४ मागासवर्गीय जाती आहेत. राज्यात जातनिहाय सर्वेक्षणाची मागणी होत असताना हैदराबादमधील मोदींच्या सभेचे खूप महत्त्व आहे. सभा सुरू होण्यापूर्वी राज्यातील काही मागासवर्गीय नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यापैकीच तेलंगणा मागासवर्गीय वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड यांचाही समावेश होता. या बैठकीनंतर ते म्हणाले की, भाजपाने ४० मागासवर्गीय उमेदवारांना तिकीट दिले आहे. राज्यात भाजपासाठी सकारात्मक वातावरण तयार झालेले आहे.

आणखी वाचा >> तेलंगणा: अभिनेते पवन कल्याण यांचा प्रभाव भाजपाला तारणार का? जेएसपीसह युतीची शक्यता

राज्यात मागासवर्गीय समाजाचा मतदानाचा पॅटर्न वेगवेगळा राहिला आहे. मात्र प्रश्न असा आहे की, राज्यातील सर्व मागासवर्गीय जातींना एकत्र आणण्यात भाजपा यशस्वी होणार का? “मागासवर्गीय जातींनी यापूर्वी कधीही एकाच पक्षाला एकगठ्ठा मतदान केलेले नाही. यामुळेच मागासवर्गीय समाजातून मुख्यमंत्री व्हावा, एवढी मागणी करण्याइतपतची राजकीय शक्ती समाजाने कमावलेली नाही. तसेच विधानसभेतही मागासवर्गीय समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे समाजाचा एखादा मुद्दा रेटता आलेला नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय मागासवर्गीय वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आर. क्रिष्णय्या यांनी दिली.

क्रिष्णय्या पुढे म्हणाले की, मागासवर्गीय समाजाला मुख्यमंत्री पद देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. तसेच त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण कोटा वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. मागासवर्गीय जातींचा सर्व्हे करणे आणि वेगळ्या अर्थसंकल्पाची घोषणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In telangana pm narendra modis appeal to the backward class community promises to give the post of cm if bjp gets power kvg
Show comments