लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान उद्या (दि. १३ मे) रोजी होत आहे. निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची चर्चा तर होत असतेच. मात्र अनेक मतदारसंघात काही अपक्षही उमेदवार असतात, त्यांची तुलनेने फारशी चर्चा होत नाही. या अपक्ष उमेदवारांचे नेमके म्हणणे काय आहे? बलाढ्य उमेदवारांना लढत देण्याची त्यांची प्रेरणा काय आहे? याबाबत फारशी चर्चा होत नाही. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने अशा काही घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होत आहे. सचिन दत्तात्रय धनकुडे असे या उमेदवाराचे नाव असून त्यांना निवडणूक चिन्ह म्हणून चप्पल ही निशाणी मिळाली आहे. मात्र त्यांनी आपल्याच निवडणूक चिन्हावर फुली मारून प्रचार चालविला आहे. निवडणूक चिन्ह त्यांच्या इच्छेविरोधात मिळाले असल्याचे सचिन धनकुडे सांगतात.
“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही”, एकनाथ खडसेंची मोठी घोषणा; म्हणाले, “राजकारणातून निवृत्ती…”
सचिन धनकुडे आपल्या दोन-तीन समर्थकांसह पुण्यातील रस्त्यांवर प्रचार करताना दिसतात. हातगाडीवर चारही बाजूंनी बॅनरचा पिरॅमिड तयार करून धनकुडे प्रचार करताना दिसतात. त्यांचे समर्थक कापडाच्या चिंध्यांची दोरी करून हातगाडी खेचत आहेत. तर धनकुडे एका हातात माईक घेऊन घोषणा देताना दिसतात. ‘चिन्ह हटवा, लोकशाही वाचवा’, अशा घोषणा देताना धनकुडे दिसतात.
द इंडियन एक्सप्रेसने धनकुडे यांच्याशी याबाबत बातचीत केली. तुम्हाला निवडणूक चिन्ह का हटवायचे आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला निवडणूक चिन्हाची गरज आहे, असे वाटत नाही. देशात जेव्हा पहिल्यांदा निवडणूक झाल्या, तेव्हा निवडणूक चिन्हाची गरज भासली होती. त्यावेळी ८५ टक्के जनता निरक्षर होती. मात्र आज ८५ टक्के लोकसंख्या साक्षर आहे. त्यामुळे सर्वांनाच निरक्षर समजणे चूक होईल. त्यामुळे जे वाचू-लिहू शकतात, त्यांच्यासाठी वेगळे ईव्हीएम असायला हवे.”
मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव, सैन्याला विशेष अधिकार; अरविंद केजरीवालांनी जाहीर केल्या १० गॅरंटी
धनकुडे म्हणतात की, ईव्हीएम मशीनवर पक्षाच्या चिन्हाऐवजी उमेदवाराचे नाव आणि त्याचा किंवा तिचा फोटो असायला हवा. निवडणूक चिन्हाचे देश, समाज आणि लोकशाहीच्यादृष्टीने १०० तोटे, अशा नावाने मी पुस्तकही लिहित आहे. जर एखाद्या भारतीय नागरिकाने पक्षाच्या चिन्हाचा एक जरी फायदा मला समजावून सांगितला तर त्याला मी एक लाख रुपयांचे बक्षीस देईल, असेही धनकुडे यांनी जाहीर केले आहे.
धनकुडे यांना यंदा चप्पल हे चिन्ह मिळाले आहे. त्यांनी आपल्या बॅनरवर लिहिले, “सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळलेल्या नागरिकाचे चप्पल हे हत्यार आहे. राजकीय तमाशाला कंटाळलेल्या मतदारांसाठी चप्पल हे उत्तर आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर चप्पल हे उत्तर आहे. युवकांच्या बेरोजगारीवरही चप्पल हाच एक उपाय आहे.”