भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाला उमेदवारी दिली आहे. यानंतर रवींद्र जाडेजाने आपल्या पत्नीचं अभिनंदन केलं आहे. आपल्या पत्नीला निवडणुकीत संधी दिल्याबद्दल जाडेजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल माझ्या पत्नीचं अभिनंदन. तू केलेले प्रयत्न आणि घेतलेल्या मेहनतीबद्दल मला अभिमान आहे. माझ्या तुला शुभेच्छा आहेत. समाजाच्या विकासासाठी असंच काम करत राहा,” असं रवींद्र जाडेजाने म्हटलं आहे.
“माझ्या पत्नीच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि तिला हे समाजकार्य करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो,” असंही जाडेजाने म्हटलं आहे.
भाजपाने गुजरात निवडणुकीसाठी गुरुवारी १६० उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये रिवाबा जाडेजाला जामनगरमधून संधी देण्यात आली आहे. पक्षाने विद्यमान आमदार धर्मेंद्रसिंग जाडेजा यांना तिकीट नाकारलं आहे.
रिवाबा जाडेजाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. काँग्रेस नेते हरीसिंग सोलंकी यांची नातेवाईक असणाऱ्या रिवाबाने २०१६ मध्ये रवींद्र जाडेजाशी लग्न केलं. राजपूत घराण्याचा वारसा चालवणारी रिवाबा जामनगर-सौराष्ट्रमध्ये सक्रिय राजकारणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाठिंबा मिळवण्यासाठी ती अनेक गावांचा दौरा करत आहे.