माझ्यासमोर भगवा सागरच बसला आहे असं मला वाटतं आहे. लहान मुलं फोटो वगैरे घेऊन आले आहेत त्यांच्या प्रेमाचाही मी आदर करतो. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाचाही मी आदर करतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या भाषणाला सुरुवात केली. पुण्यातल्या या भूमित महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे समाजसुधारक देशाला दिले आहेत. पुणे हे जितकं प्राचीन आहे तितकंच ते सुधारणावादीही आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पुणे तिथे काय उणे म्हणतात ते उगाच नाही
पुण्यात प्रत्येक क्षेत्रातले उत्तम लोक आहेत. म्हणूनच तर म्हणतात की पुणे तिथे काय उणे? काँग्रेसने देशात साठ वर्षे राज्य केलं. मात्र काँग्रेसच्या काळात देशातल्या अर्ध्या जनतेकडे मूलभूत सोयी सुविधा नव्हत्या. आत्ता आम्हाला फक्त १० वर्षे तुमची सेवा करण्यासाठी मिळाले आहेत. मात्र या दहा वर्षांत आम्ही मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेतच शिवाय प्रत्येक वर्गातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण कशा होतील याकडे लक्ष केंद्रीत केलं. एक व्हिजन घेऊन आम्ही काम करतो आहोत. कुणी शहरात असो की गावात चांगले रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा पाहून त्या माणसांचं मन प्रसन्न होतं.
पुण्याचा विकास कसा झाला पाहिलं ना?
“पुणे मेट्रो, पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळाचा विकास, हायस्पीड वंदे भारत ट्रेन हे सगळं पुण्यात आहे आणि आधुनिक भारताचं हे चित्र आहे. पुणेकरांनी लिहून घ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही लवकरच बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल. ही मोदींची गॅरंटी आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार रिमोटवर चालणारं सरकार होतं. त्या सरकारने दहा वर्षांत जितके पैसे खर्च केले ते आम्ही एका वर्षांत खर्च करतो. काँग्रेसच्या काळात आपल्याला मोबाइल आयात करावे लागत होते आता आपण निर्यात करतो आहोत. भाजपाने खूप चांगली कामं युवकांसाठी केली आहेत. तसंच समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी केली आहेत.”
हे पण वाचा- भविष्यात सत्ताधारी निवडणुकाच टाळतील; ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भीती
२०१४ च्या आधी भ्रष्टाचार आणि महागाई
“२०१४ च्या आधी दहा वर्षांत तुमच्याकडून महागाई आणि भ्रष्टाचारासाठी डबल टॅक्स वसूल केला गेला. २०१४ नंतर आम्ही महागाईही आटोक्यात आणली भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई केली. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. दहा वर्षांमध्ये कर चुकवणाऱ्यांना आम्ही सवलती दिल्या आहेत. सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. त्यामुळे देशभरातल्या करदात्यांची अडीच लाख कोटींची बचत झाली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब आनंदात आहेत” असंही मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे.
“आयुषमान योजनेच्या अंतर्गत जनऔषधी केंद्रही आम्ही सुरु केली आहेत. त्यामध्ये ८० टक्के सवलतीच्या दरांत औषधं विकली जातात. गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्तात औषधं मिळतात. यातून देशभरात मध्यमवर्गीय, गरीब यांचे दीड लाख कोटी रुपये वाचले आहेत” असंही मोदी यांनी सांगितलं.
शरद पवारांचं नाव न घेता अतृप्त आत्मा असा उल्लेख
“आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही ते दुसऱ्याच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात. १९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहात होता. २०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केलं ते महाराष्ट्राला माहीत आहेच. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या अतृप्त आत्म्याने सुरु केला आहे” असं म्हणत नरेंद्र मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
राहुल गांधींची उडवली खिल्ली
“भाजपासह महायुती सरकार महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. देशाला पुढे नेत आहेत. मात्र दुसरीकडे इंडिया आघाडी काँग्रेसच्या युवराजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विचारा गरीबी कशी हटते तर ते म्हणतात खटाखट, खटाखट, युवराजांना विचारा विकसित भारताची योजना काय तर ते म्हणतात टकाटक टकाटक. असं म्हणत मोदींनी राहुल गांधींचीही खिल्ली उडवली आहे. तसंच यांच्या युवराजांमुळेच लोक त्यांचा पक्ष सोडून जात आहेत” असंही मोदींनी म्हटलं आहे.