निवडणुकांचे अंदाज वर्तविण्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि सध्या काँग्रेसशी जवळीक साधलेल्या योगेंद्र यादव यांच्या एका विश्लेषणाच्या व्हिडीओतील स्क्रिनशॉट घेऊन निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पोस्ट लिहिली. “माझ्यासारखेच योगेंद्र यादवदेखील भाजपाचे सरकार स्थापन होईल, असे म्हणत आहेत”, अशी पोस्ट प्रशांत किशोर यांनी केल्यानंतर अनेक माध्यमांनी याची दखल घेतली. योगेंद्र यादव यांनी भाजपाचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता स्वतः योगेंद्र यादव यांनी या चर्चांना पुर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले योगेंद्र यादव?
योगेंद्र यादव यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “गोदी मीडियाचा खेळ बघा. मी म्हटलं की, यावेळी भाजपाला बहुमत नाही मिळणार आणि कदाचित एनडीएलाही बहुमत मिळू शकणार नाही. पण गोदी मीडिया म्हणतो की, मी भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे. मी म्हटले की, भाजपाला ५० जागांपेक्षा अधिकचे नुकसान होईल. तसेच त्यांच्या २५० पेक्षा कमी जागा येऊ शकतील. पण गोदी मीडिया म्हणतो की, मी प्रशांत किशोर यांच्याशी सहमत आहे. (त्यांनी एनडीएच्या कमीत कमी ३०३ जागा येण्याचा दावा केला आहे.)”
‘जिंकणार तर भाजपाच, काँग्रेसला किती जागा?’ योगेंद्र यादव यांच्या अंदाजानंतर प्रशांत किशोर यांचा टोला
नेमकं प्रकरण काय?
मागच्या काही दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात येत होतं. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान थापर आणि किशोर यांची बाचाबाचीही पाहायला मिळाली. प्रशांत किशोर यांनी याआधी राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक अशा राज्यात काँग्रेसचा विजय झाला, त्यामुळे भाजपाच्या विजयाचा अंदाज कशावरून खरा आहे? असा प्रश्न प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला होता.
त्यामुळे प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांच्या व्हिडीओतील एक स्क्रिनशॉट एक्स वर शेअर करत योगेंद्र यादव यांनाही भाजपाचे सरकार येणार असल्याचे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले होते. प्रशांत किशोर यांनी आज सकाळी केलेल्या पोस्टमध्ये याचा उल्लेख केला होता. त्यानंतर योगेंद्र यादव हे भाजपाचा विजय निश्चित मानत असल्याचे बोलेल गेले. मात्र आता या वादावर खुद्द त्यांनीच पडदा टाकला आहे.