काही दिवसांपूर्वी पूंछमध्ये दहशतवादी हल्ल्यात एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले. तर, काही जवान जखमी आहेत. त्यामुळे काश्मीर अशांत असल्याच्या बातम्या पुन्हा एकदा येऊ लागल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हे हल्ले होत असल्याने मोदी सरकार अडचणीत येत आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते सामनाने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
“पुलवामात जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक विस्तवासारखं असलेलं जे वास्तव जगासमोर मांडलं, त्याला कुणी उत्तर देऊ शकलेलं नाही. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. तेही कश्मीरचे. त्यांचे अधिकार सर्वांना माहीत आहेत. अधिकृत पदावर बसलेल्या, घटनात्मक पदावर बसलेल्या माणसानं जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं, त्याच्यावरती आज कुणी चर्चा करत नाहीये. काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण? पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण? आणि हा जबाबदारीचा धोंडा ज्याच्या त्याच्या पक्षामध्ये आपण टाकणार आहोत की नाही? कारण अजूनही जर कश्मीर अशांत असेल तर कशासाठी यांना परत मतं द्यायची? एका बाजूने लेह-लडाखमध्ये असेल, अरुणाचलमध्ये असेल, चीन अतिक्रमण करतोय, रस्ते बांधतोय. आपल्या गावांची नावं बदलतोय. तरीसुद्धा आम्हाला म्हणजे सरकारला काही वाटत नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा >> “मी मोदी सरकारला गजनी सरकार म्हणतो”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले, “सगळ्या भाकडकथा…”
“मध्यंतरी मोदीजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांबद्दल बोलले होते की, बाळासाहेबांनी कधी हा विचार नाही केला की, कश्मीरमधले पंडित, माझा काय संबंध? अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदुहृदयसम्राटच होते. तेव्हा कश्मिरी पंडितांना शिवसेनाप्रमुखांनी बोलावलं, त्यांना आश्रय दिला. त्या वेळी मोदी हे नावसुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं. आता तुम्ही तर पंतप्रधान आहात. तरी कश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीयेत. कश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत, मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं, अजूनही मोदी तिकडे जात नाहीत”, अशी टीका ठाकरेंनी केली.
मोदींकडे उत्तरं आहेत का?
“मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाहीयेत. जणू काही सगळे प्रश्न संपले आहेत आणि उद्धव ठाकरे हा एकच प्रश्न देशासमोर आहे, अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. हे काहीतरी आक्रितच आहे! म्हणजे उद्धव ठाकरेंना संपवून काश्मीर शांत होणार आहे का? उद्धव ठाकरेंना संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का? उद्धव ठाकरेंना संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत परत मिळणार आहे का? मोदींकडे काय उत्तरं आहेत याच्याबद्दल?” असा रोखठोक सवालही त्यांनी विचारला.