महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे लोकसभेतील शिवसेना-महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यंदाच्या निवडणुकीत कोणताही विषय नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. राज ठाकरे म्हणाले, “यंदाची लोकसभा निवडणूक अशी पहिली निवडणूक आहे, ज्यामध्ये निवडणुकीत काहीच विषय नाहीत. कोणताही विषय नसल्यामुळे सर्वचजण आई-बहिणीवरून उद्धार करत आहेत. खरंतर निवडणुकीत लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आले पाहिजेत.”
राज ठाकरेंचं पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुषमा अंधारेंची क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर टीका
राज ठाकरे यांनी यावेळी आणीबाणीनंतरच्या अनेक लोकसभा निवडणुकांची माहिती दिली. “१९७७ सालची निवडणूक मला आठवतेय, आणीबाणीच्या विरोधात ती निवडणूक लढली गेली. १९८० साली पुन्हा इंदिरा गांधी आल्या. १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या, १९८९ ला बोफोर्स प्रकरण, १९९१ ला राजीव गांधी गेले, १९९६ ला बाबरी मशीद, १९९९ साली कारगिल, २००४ साली इंडिया शायनिंग, २०१४ ला मोदींची लाट आली आणि २०१९ ला पुरवामा प्रकरण घडले. पण या निवडणुकीत काहीच विषय नाही”, असे राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंमुळेच राजकारणाचा विचका
राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. २०१९ साली उद्धव ठाकरेंच्या महत्त्वकांक्षेमुळे राज्याच्या राजकारणाचा विचका झाला, असे ते म्हणाले. “२०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत विधानसभेची निवडणूक लढवली, पण निकालांनंतर जेंव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय भाजपच सरकार बसणार नाही, तेंव्हा त्यांनी पिल्लू सोडलं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं होतं. आणि काय तर म्हणे बंद खोलीत ठरलं होतं, मग ते आधीच का नाही सांगितलं? आणि विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस जेंव्हा नरेंद्र मोदी आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून सांगत होते, तेंव्हा का नाही विरोध केलात? बरं, समजा जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, तर त्यांनी विरोध केला असता का? आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पार विचका झाला आहे, कोण कुठे आहे हे कळत नाहीये याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत”, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
मी दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार नाही
पक्ष फोडाफोडीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी जेंव्हा शिवसेना सोडली तेंव्हा लपूनछपून काही नाही केलं. मी बाळासाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगून आलो की पक्ष सोडतोय. त्यांनी मला मिठी मारली आणि विचारलं काय करणार आहेस, मी म्हणलं अजून काही ठरलं नाहीये.. पण एक गोष्ट मनात होतं की सन्माननीय बाळासाहेब सोडून दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार नाही. पक्ष काढेन, कितीही अडचणी येऊ देत, चढउतार येऊ दे माझा पक्ष मी चालवणार.