Jammu Kashmir Assembly Elections National Conference Manifesto : निवडणूक आयोगाने नुकतीच जम्मू आणि काश्मिर विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. तीन टप्प्यात राज्यात निवडणुका पार पडतील. दरम्यान, सर्वच पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच सोमवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने त्यांचा निवडणुकीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. याद्वारे नॅशनल कॉन्फरन्सने राज्यातील जनतेला १२ आश्वासनं दिली आहेत. यामध्ये कलम ३७० परत लागू करणे, जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या आश्वासनाचा समावेश आहे. तसेच २००० साली तत्कालीन विधानसभेने पारित केलेल्या स्वायत्तता ठरावाच्या अंमलबजावणीचाही यात समावेश करण्यात आला आहे.
जून २००० मध्ये फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सच्या सरकारने विधानसभेमध्ये एक ठराव पारित केला होता. यामध्ये १९५३ च्या आधीची संवैधानिक स्थिती पुन्हा बहाल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने हे मागणी फेटाळली होती.
काश्मिरी पंडितांनाही मोठं आश्वासन
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा व राज्यसभेत विधेयक मांडून जम्मू काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केलं होतं. तसेच जम्मू-काश्मीरमधून लडाखला वेगळं केलं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांची (जम्मू-काश्मिर व लडाख) केली होती. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच राजकीय कैद्यांना माफी देऊन कैदेतून, नजर कैदेतून मुक्त करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासह काश्मिरी पंडितांना सन्मानाने काश्मिर खोऱ्यात परत आणणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. यासह राज्यात नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार आल्यास नागरिकांना मोफत वीज आणि गॅस सिलिंडर दिले जातील, असं आश्वासन नॅशनल कॉन्फरन्सने दिलं आहे.
निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार १८ सप्टेंबर, ५ सप्टेंबर व १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये जम्मू आणि काश्मिरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होईल.
ओमर अब्दुल्ला निवडणुकीपासून दूर राहणार
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळत नाही, तोवर विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार नाही, अशी घोषणआ ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. त्यांचे वडील व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला हे आगामी निवडणुकीत पक्षाचा कारभार पाहणार आहेत. पक्ष फारुक अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार आहे. दरम्यान, ओमर अब्दुल्ला म्हणाले, “मी ईश्वराचे आभार मानतो, अखेर आपल्या राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. तारखांबाबत जरा गोंधळ होता. परंतु, आता निवडणूक होत आहे”.