Jayant Patil : शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संघर्षासाठी तयार झाला आहे. आमचा पक्ष फुटला तेव्हा आम्हाला हिणवलं जात होतं की कुणी राहिलं नाही तुम्हाला प्रचाराला तरी माणसं मिळतील का? अशी अवहेलना केली जात होती. मात्र शरद पवार या नावाचं वलयच असं आहे की अनेक गोष्टी पुढे घडत गेल्या. असा जिल्हा आणि तालुका नाही जिथे शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री जयंत पाटील अशा घोषणा देऊ नका त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात असंही वक्तव्य जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केलं आहे.
आमचा पक्ष फुटला तेव्हा..
आमच्या पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. एक मतदारसंघ तर असा आहे जिथे ३० जणांनी सांगितलं आहे आम्हाला उमेदवारी द्या. महाराष्ट्रातलं सरकार बदलण्याची महाराष्ट्राची मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा बोजवारा उडाला आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे. आठ लाख कोटींचं कर्ज झालं आहे. महायुतीचे लोक सत्तेतून जातील तेव्हा महाराष्ट्रावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज ठेवून जातील. कायदा आणि सुव्यवस्था याची अवस्था तर वाईट आहे. आमदारच गोळीबार करत आहेत, गुंडांची गरजच उरली नाही. पोलिसांची मानसिकता या सरकारने बिघडवली. माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असं सारखं पोलिसांना धमकावलं जातं आहे असाही आरोप जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केला. एक फुल आणि दोन हाफ करतात काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. असाही टोला जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी लगावला आहे.
लाडकी बहीण योजना हे महायुतीचं पुतना मावशीचं प्रेम
लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या योजना म्हणजे महायुती सरकारचं पुतना मावशीचं प्रेम आहे. २० नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या योजना चालणार आहेत असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मला भाजपा आणि आमच्या पक्षातलेच लोक सांगत होते की तिकडे चला. मी त्यांना दिवारच्या संवादाप्रमाणे उत्तर दिलं तिकडे सगळं असेल आमच्याकडे शरद पवार आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणाईला त्यांची भुरळ आजही पडली आहे, असंही जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? शरद पवारांचं सूचक विधान काय?
तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा
शिवस्वराज्य यात्रेची ही शेवटची सभा आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे ते सगळ्या घरांत जाऊन सांगा. आपल्या सगळ्यांना चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे चिन्ह ठेवलं. छत्रपती शिवरायांच्या विचारांवरचा महाराष्ट्र घडवा अशी शपथ आम्ही सगळ्यांनी घेतली होती. महाराष्ट्रात असा मतदारसंघ मिळणार नाही मला प्रचाराची सभा न घेता मला महाराष्ट्राने सातवेळा निवडून दिला आहे. माझ्याविरोधात कुणी शिव्या दिल्या की कार्यभाग साधला जातो, असंही जयंत पाटील ( Jayant Patil ) म्हणाले.
शरद पवार माझे गॉडफादर-जयंत पाटील
आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणात इथपर्यंत मला आणलं. गॉडफादर मिळाला की प्रगती होते. माझा गॉडफादर माझ्या मागे (शरद पवार) बसला आहे. मला इतकं शिकायला मिळालं की विचारु नका. वागायचं कसं? बोलायचं कसं? शरद पवारांसारखा नेता भारतात नाही. आज शरद पवार या ठिकाणी आले आहेत मी त्यांचे आभार मानतो असंही जयंत पाटील म्हणाले. मी जेव्हा मुहूर्त पाहतो तेव्हा शरद पवारांना आवडत नाही. २४ ऑक्टोबरला मी अर्ज भरेन तेव्हा आपण सगळे पुन्हा भेटू. त्यानंतर महाराष्ट्रात फिरावं लागणार आहे. महाराष्ट्रातून अनेक लोक माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी येणार आहेत. असं जयंत पाटील म्हणाले तेव्हा जयंत पाटील मुख्यमंत्री अशा घोषणा देण्यात आल्या, त्यावर जयंत पाटील ( Jayant Patil ) म्हणाले अशा घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात. या त्यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला.