कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेतेही कर्नाटकात प्रचार करत आहेत. रविवारी ( ७ मे ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीतील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात काय करणार, असं टीकास्र देवेंद्र फडणवीसांनी सोडलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. पण, हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : “महाराष्ट्राचं चित्र बदलायचं ठरवलंय”, शरद पवारांच्या विधानावर विखे-पाटलांची टीका; म्हणाले, “अशा…”
फडणवीसांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते निपाणी राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीला जे कुणी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणत असतील… त्यांचा भाजपाने फौजदाराचा हवालदार केला आहे. ज्यांना स्वत:चं स्थान टिकवता आलं नाही. त्यांनी आमची माप काढवीत का?.”
“जनतेनं आमचं सरकार स्वीकारलं असताना, आमच्यातील लोक फोडण्याचं पाप केलं. नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, असं वाटलं होतं. पण, दिल्लीतील लोकांनी दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं. गडचिरोली, जळगाव आणि भंडाऱ्यापर्यंत आमचा पक्ष पसरला आहे. आमचा पक्ष साडेतील जिल्ह्यांचा नाही,” असंही जयंत पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा : “नाना पटोले राजकारणातील कमी बुद्धी असलेले प्रदेशाध्यक्ष, ज्याला…”, शहाजीबापू पाटलांची टीका
“शरद पवारांच्या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेस २०२४ साली सर्वात मोठा पक्ष होणार आहे. कार्यकर्त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे,” असे जयंत पाटलांनी सांगितलं.