Jayashree Thorat Reaction on Vasantrao Deshmukh Derogatory Speech : माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. जवळपास एक मिनिट ते जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांत टीका करत होते. देशमुख्यांच्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला असून काँग्रेस कार्यकर्ते व थोरात समर्थकांनी सुजय विखेंचे बॅनर फाडून निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान, जयश्री थोरात यांनी आज (२६ ऑक्टोबर) सकाळी प्रसारमाध्यमांसमोर येत या सगळ्या प्रकारावर पहिल्यांदाच भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “वसंतराव देशमुख यांनी केलेलं वक्तव्य हे कोणत्याही नेत्याला न शोभणारं आहे. तुम्ही (भाजपा) महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देण्याच्या गप्पा मारता, परंतु, तुमच्याच पक्षात अशा प्रकारची वक्तव्ये करणारे लोक असतील तर महिलांनी राजकारणात का यावं? मी काय वाईट करत होते? मी केवळ माझ्या वडिलांसाठी राजकारणाच्या मैदानात उतरले होते. युवा संवाद यात्रेद्वारे लोकांना भेटत होते. मी असं काय केलं होतं की माझ्याबद्दल इतकं वाईट बोललं गेलं?”
हे ही वाचा >> Rahul Gandhi : राहुल गांधी जागावाटपावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर नाराज? वडेट्टीवार म्हणाले, “उमेदवार निवडीत गफलत…”
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “वसंतराव देशमुख जे काही बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच अशा गलिच्छ भाषेत, खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. हे त्यांच्या वयाला शोभणारं नाही. विरोधकाला देखील एक पातळी असते, मात्र ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या मुलींबद्दल घाणेरडं बोलत होते. हे त्यांना शोभणारं नाही. माझ्या आजोबांनी यापूर्वी त्यांना एकदा खडसावलं होतं, त्यांना सरळ केलं होतं. आमच्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चा देखील नेला होता. परंतु, ते आजही तसेच आहेत. अशा माणसाला लोक आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान का देत असतील हाच प्रश्न आहे. ज्यांनी (सुजय विखे पाटील) त्यांना आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिले, त्यांच्याबद्दलच मला प्रश्न पडले आहेत. ते नेमका काय विचार करत होते? त्यांनी देशमुख यांना आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान का दिलं असेल? असा मला प्रश्न पडला आहे.
हे ही वाचा >> मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली संधी?
वसंतराव देशमुख कोण आहेत?
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या गावचे रहिवासी असलेले वसंतराव देशमुख हे तालुक्यामध्ये थोरात यांचे पारंपारिक विरोधक आहेत. देशमुख सुरुवातीला दिवंगत भाऊसाहेब थोरात टीका करायचे, त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करू लागले. यातून अनेकदा वादावादीचेही प्रकार घडले होते. संगमनेर साखर कारखान्याच्या एका वार्षिक सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. कदाचित वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून तसे अलिप्त होते. मात्र काल सुजय विखे यांच्या सभेचे अध्यक्ष स्थान त्यांना देण्यात आले होते. येथेही त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उठला.