Jharkhand Assembly Polling 2024 Phase 2 Updates : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ३८ जागांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यात एकूण ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. ३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. याशिवाय उर्वरित मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्व बुथवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून १ कोटी २३ लाख ५८ हजार १९५ लोक मतदान करणार आहेत. संथाल परगाणाच्या १८ जागांवर, उत्तर छोटानागपूरच्या १८ जागांवर आणि दक्षिण छोटानागपूरच्या २ जागांवर मतदान होणार आहे. तर, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झारखंडमध्ये ६७.५९ टक्के मतदान झालंय. महाराष्ट्रात हेच प्रमाण ५८.२२ इतकं आहे.
रिटर्निंग ऑफिसरला अटक
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीदरम्यान देवघर जिल्ह्यातील मधुपूर विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १११ वर पीठासीन अधिकाऱ्याने कथित गैरवर्तन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) उमेदवार आणि मंत्री हाफिझुल हसन यांच्या बाजूने अधिकाऱ्याने पक्षपातीपणा दाखवला, असा दावा दुबे यांनी केला. या तक्रारीनंतर, निवडणूक आयोगाने त्वरीत कारवाई करत संबंधित पीठासीन अधिकाऱ्याला अटक केली. देवघर येथे पत्रकारांशी बोलताना दुबे यांनी या घटनेला दुजोरा दिला.
सत्ताधारी जेएमएम काँग्रेस युतीची भाजपा आणि त्याचा स्थानिक ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन पार्टी यांच्याविरोधात सामना आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बऱ्हेतमध्ये भाजपाच्या गमालीएल हेम्ब्रोम यांच्याशी तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन या गांडेमध्ये भाजपाच्या मुनिया देवी यांच्याशी लढत होणार आहे. भाजपाचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी धनवार जागेवर सीपीआय एलचे राजकुमार यादव यांच्याकडून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय राजकीय दिग्गज शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांचा जामतारा येथे काँग्रेसच्या इरफान अन्सारी यांच्याशी सामना होणार आहे.
हेही वाचा >> Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
झारखंडमध्ये १४ हजार २१८ मतदान केंद्रे असून त्यात २३९ मतदान केंद्रे हे महिलांकेंद्रित आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केल्यापासून २०० कोटी रुपयांची अवैध रोकड आणि साहित्य जप्त केले आहेत. २०१९ मध्ये जेएमएम काँग्रेस आणि आरजीडी युतीने ४७ जागा, तर भाजपाने २५ जागा जिंकल्या होत्या.
भाजपासाठी आशेची सकाळ
“झारखंडसाठी ही आशेची सकाळ आहे. झारखंडला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. जनता असे सरकार निवडणार आहे जे पाच वर्षे राज्य करेल. ‘माटी-बेटी-रोटी’ वाचवण्याचे वातावरण आहे. मी मतदान करणार आहे. आम्ही पूर्ण बहुमत मिळवू आणि सरकार स्थापन करू,” असे चंदनकियारी येथील भाजपचे उमेदवार अमरकुमार बौरी म्हणाले.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भाजपावर टीका
झारखंडच्या जनतेला केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपवर राज्याच्या विकास निधीतील १.३६ लाख कोटी रुपयांच्या हक्काच्या वाट्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. सोरेन यांनी भाजप नेत्यांच्या वचनबद्धतेचा अभाव अधोरेखित केला आणि असे म्हटले की, “भाजपचे प्रत्येक लहान-मोठे नेते झारखंडमध्ये प्रचारासाठी आले आणि गेले, परंतु कोणीही आमच्या हक्कांवर बोललं नाही.” नवीन उड्डाणपूल, शाळा, महाविद्यालये, मेट्रो रेल्वे आणि शिक्षण, आरोग्य, आदिवासी कल्याण आणि सामाजिक सुरक्षा अशा कल्याणकारी योजनांसाठी वापरता येणारा महत्त्वाचा निधी केंद्राने रोखून धरल्याबद्दल त्यांनी टीका केली. हा अस्मिता आणि विकासाचा प्रश्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, “हा आमचा हक्क आहे, आमच्या मुलांचे भविष्य आहे आणि झारखंडवासियांची सुरक्षा आहे. आम्ही आमचा हक्क घेऊ.”
पहिल्या टप्प्यात माओवाद्यांकडून बहिष्काराचे आवाहन
पहिल्या टप्प्यात माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केले होते. परंतु, नक्षलग्रस्त पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात मतदारांनी हे आवाहन धुडकावत मतदान केले. नक्षलवाद्यांनी मतदानात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र सुरक्षादलांनी ते हाणून पाडले. सरकारी योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे जमा झाल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. ‘झारखंड मुख्यमंत्री मैयन सन्मान योजनेच्या’निधीबाबत चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली. हा निधी दर महिन्याला सहा किंवा सात तारखेला जमा होतो, मग यंदा मतदानापूर्वीच कसा जमा केला? असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केला आहे.