राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडले आहेत. पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजित पवार यांच्याबरोबर गेले असून ते आता अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार गटाने यंदा पुन्हा एकदा तटकरेंना या मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने माजी खासदार अनंत गीतेंना येथून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, गीतेंच्या प्रचारासाठी मंगळवारी (२३ एप्रिल) स्वतः शरद पवार यांनी रायगडच्या मोर्बा येथे प्रचारसभेला संबोधित केलं. त्यांच्याबरोबर आमदार जितेंद्र आव्हाडही या सभेला उपस्थित होते. पवार आणि आव्हाडांनी या सभेद्वारे त्यांच्या जुन्या साथीदाराला (तटकरे) त्याच्याच मतदारसंघात जाऊन आव्हान दिल्याचं मंगळवारी पाहायला मिळालं.
या सभेला संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर गंभीर आरोप केले. आव्हाड म्हणाले, मला या मंचावरून सुनील तटकरेंना विचारायचं आहे की, तुम्हाला शरद पवार यांनी काय कमी केलं होतं ते आम्हाला सांगा. आधी तुम्ही ए. आर. अंतुलेंना (महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री) झोपवलंत. आता त्यांच्या मुलाच्या, पुतण्याच्या की जावयाच्या खांद्यावर हात टाकून फिरताय. आज अंतुले वरून बघत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असतील.”
तटकरेजी शरद पवारांनी तुम्हाला काय कमी केलं होतं? तुम्हाला मंत्री बनवलं. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांना सांगितलं होतं की, तुम्हाला मंत्रिपद देऊ नका, परंतु शरद पवार यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांनी तुम्हाला मंत्रिपद दिलं. तुमच्या मुलीलाही मंत्रिपद दिलं. तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला आणि त्याच्या मुलालाही पद दिलं. पवारांनी एकाच घरात पाच-पाच पदं दिली तरी तुम्ही त्यांचं घर फोडलंत. शरद पवार यांचं घर फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते तटकरेंनी केलं आहे. मी अल्लाहला साक्षी मानून खूप गांभीर्याने हे वक्तव्य करतोय.
हे ही वाचा >> “अजित पवारांबाबतची ती बातमी वाचून माझं मन चलबिचल झालं”, शेकापच्या जयंत पाटलांची शरद पवारांसमोर ‘मन की बात’
जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुनील तटकरे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, मंत्री होते, तेव्हा अगदी पहाटे सात वाजतादेखील शरद पवारांच्या घरात जाण्याचा अधिकार जर कोणाला होता तर तो केवळ सुनील तटकरेंनाच. परंतु, २०१४ पासून २०२३ पर्यंत तटकरे रोज सकाळी शरद पवारांकडे जायचे आणि त्यांना म्हणायचे साहेब आपण भाजपात जाऊया. त्यानंतर ते बाहेर येऊन लोकांना म्हणायचे शरद पवारांनी भाजपात जाण्यास होकार दिला आहे. परंतु, शरद पवार हे केवळ तुमच्यापासून दूर जाण्यासाठी तसं बोलायचे. ते तुम्हाला सांगायचे तुम्ही जाऊन भाजपाशी चर्चा करून या. पंरतु, तुम्हाला ते कधी कळलंच नाही. केवळ तुम्हाला बरं वाटावं म्हणून ते तसं बोलायचे. परंतु, शरद पवार हे कधीही जातीयवादी लोकांशी हातमिळवणी करू शकत नाहीत हे संपूर्ण देशाला माहिती आहे. शरद पवार यांना त्यांचं घर मोडताना दिसत होतं. घर एकत्र राहावं यासाठी ते भाजपात जाऊ असं कधी म्हणाले नाहीत. ते म्हणाले, घर मोडलं तरी चालेल. परंतु, आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही.