राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार गटातील नेते थेट शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. तर शरद पवारांच्या गटातील नेते त्यावर प्रत्युत्तर देत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रायगडमधील महाविकास आघाडीच्या सभेतून स्थानिक खासदार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार आणि माजी खासदार अनंत गीते (शिवसेनेचा ठाकरे गट) यांच्या प्रचारार्थ रायगडच्या मोर्बा येथे मविआची जाहीर सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या सभेला संबोधित केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “खूप दिवसांनंतर भाषणाची संधी मिळली आहे. त्यामुळे सगळ्यांचा हिशेब चुकता करणार. येत्या निवडणुकीत सर्व पाकिटमारांचा हिशेब होईल. मला एक गोष्ट कळत नाही की, ज्यांनी लोकांच्या घरावर दरोडे टाकले, चोरी केली तरी त्यांना सुखाची झोप कशी काय लागते तेच मला समजत नाही. मला या मंचावरून सुनील तटकरेंना विचारायचं आहे की, तुम्हाला शरद पवार यांनी काय कमी केलं होतं ते आम्हाला सांगा. आधी तुम्ही ए. आर. अंतुलेंना (महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री) झोपवलंत. आता त्यांच्या मुलाच्या, पुतण्याच्या की जावयाच्या खांद्यावर हात टाकून फिरताय. आज अंतुले वरून बघत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असतील.” दरम्यान, सभेला उपस्थित लोकांनी आव्हाड यांना आठवण करू दिली की, तो अंतुलेंचा जवई आहे. त्यावर आव्हाड म्हणाले, पुतण्या असो वा जावई तो ए. आर. अंतुलेंचीच ओळख सांगतो ना… मला त्यांचं नातं माहीत नाही.
हे ही वाचा >> “अजित पवारांबाबतची ती बातमी वाचून माझं मन चलबिचल झालं”, शेकापच्या जयंत पाटलांची शरद पवारांसमोर ‘मन की बात’
शरद पवार गटातील आमदार आव्हाड म्हणाले, तटकरेजी शरद पवारांनी तुम्हाला काय कमी केलं होतं? तुम्हाला मंत्री बनवलं. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी तुमच्या मंत्रिपदाला विरोध केला होता. तरीदेखील शरद पवार यांनी तुम्हाला मंत्री केलं. खरंतर जयंत पाटील हे तुम्हाला चांगलंच ओळखतात. त्यामुळेच ते शरद पवारांना म्हणाले होते की, तटकरेंना मंत्रिपद देऊ नका. परंतु, शरद पवार यांनी तुम्हाला, तुमच्या मुलीला, तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला आणि तुमच्या भावाच्या मुलालाही पद दिलं. एका घरात पाच-पाच पदं देऊनही तुम्ही त्यांचं घर फोडलंत. शरद पवार यांचं घर फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते तटकरेंनी केलं आहे. मी अल्लाहला साक्षी मानून खूप गांभीर्याने हे वक्तव्य करतोय. मी ठामपणे दावा करतोय की, तटकरेंनीच शरद पवारांचं घर फोडलं. शरद पवार यांच्या घरात कोणी भींत उभारली असेल तर ती तटकरेंनीच उभारली आहे.