पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ग्वाल्हेरमधील द सिंदिया स्कूलच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. यावेळी ज्योतिरादित्य सिंदिया यांना “गुजरातचा जावई…” असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सिंदियावर कौतुकाचा वर्षाव केला. पूर्वीच्या ग्वाल्हेर राजघराण्यातील वशंज असलेल्या सिंदिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसह नृत्यांचा आनंद घेतला. कारणही तसेच होते. काही तासांआधीच भाजपाने विधानसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये सिंदिया यांच्या अनेक समर्थकांना उमेदवारी जाहीर केल्याचे निदर्शनास आले. १७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवळपास महिन्याभरापासून सिंदिया गटाचे राज्यातील भाजपा नेतृत्वाशी मतभेद चालू होते. २०२० साली सत्ताधारी काँग्रेसमधून बाहेर पडत सिंदिया यांच्या निकटवर्तीय आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून मुळच्या भाजपाच्या नेत्यांसह सिंदिया गटाचे वाद चालू होते. सिंदिया यांचा गट भाजपात सामील झाल्यामुळे काँग्रेसचे सरकार पडून भाजपाचे सरकार स्थापन झाले, तरीही भाजपामधील काही नेते सिंदिया गटाला स्वीकारण्यास तयार नव्हते, ही खदखद सिदिंया गटात होती.

हे वाचा >> ज्योतिरादित्य सिंदिया यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी; ३४ मतदारसंघांत ‘राजकीय वजन’ सिद्ध करावे लागणार!

काही महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासह आलेले काही नेते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. सिंदिया यांचे निष्ठावंत एक एक करून पुन्हा काँग्रेसमध्ये परतत असल्यामुळे सिदिंया गटातील उरलेल्या नेत्यांच्या जागी भाजपाच्या जुन्या नेत्यांना तिकीट दिले जाईल, अशी अफवा राजकीय वर्तुळात पसरली होती. मात्र आता जेव्हा काँग्रेस आणि भाजपाने जवळपास २३० जागांसाठी उमेदवार यादी घोषित केलीये, त्यावरून दोन्ही पक्षांनी सिंदिया यांच्या निष्ठावंताना उमेदवारी दिली असल्याच दिसून येत आहे.

१० मंत्री, पाच आमदार आणि तीन पराभूत आमदारांना तिकीट

सिंदिया यांच्यासह त्यांच्या २५ निष्ठावंतांनी २०२० साली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी विद्यमान १८ आमदारांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. या यादीत १० विद्यमान मंत्र्यांचाही समावेश आहे. ऊर्जा मत्री प्रद्युम्न सिंह तोमर (ग्वाल्हेर), जलसंपदा मंत्री तुलसी सिलावत (सानवेर, इंदूर), औद्योगिक धोरण आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री राजवर्धन सिंह दत्तीगाव (बडनावार, धार), सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रभुराम चौधरी (सांची, रायसेन), महसूल मंत्री गोविंद सिंह राजपूत (सुरखी, सागर), अन्न मंत्री बिसाहुलाल सिंह (अनुपपूर), पर्यावरण मंत्री हरदीप सिंह डांग (सुवासरा, मनसौर), पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया (बामोरी, गुना), एमपी राज्य नागरी पुरवठा महामंडळाचे अध्यक्ष प्रद्युम्न सिंह लोधी (मल्हारा, छतरपूर) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुरेश धाकड (पोहारी, शिवपुरी) या मंत्र्यांचा भाजपाच्या यादीत समावेश केलेला आहे.

जयपाल सिंह जज्जी (अशोक नगर), कमलेश जाटव (अंबाह, मुरैना), ब्रजेद्र सिंह यादव (मुंगौली, अशोक नगर), मनोज चौधरी (हातपिपिलिया, देवास) आणि नारायण पटेल (मांधाता, निमाड) या पाच निष्ठावंत आमदारांनाही भाजपाने तिकीट दिले आहे.

महत्त्वाचे म्हणजे भाजपाने आपल्या जुन्या-जाणत्या नेत्यांची नाराजी पचवून २०२० सालच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या सिंदिया यांच्या तीन निष्ठावंतांनाही पुन्हा तिकीट दिले. ज्यामध्ये माजी महिला व बाल विकास मंत्री इमरती देवी (डबरा, ग्वाल्हेर), अदल सिंह कंसाना (सुमावली, मुरैना) आणि रघुराज सिंह कंसाना (मुरैना) या तीन आमदारांचा समावेश आहे.

सात विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले

सिंदिया यांच्या सात निष्ठावंत आमदारांनी २०२० सालच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवूनही तिकीट नाकारण्यात आले आहे. शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री ओपीएस भदोरिया (मेहगाव), मुन्ना लाल गोयल (ग्वाल्हेर पूर्व), रक्षा सनोरिया (भांडेर) आणि सुमित्रा देवी कस्देकर (नेपानगर) यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. यानंतर मुन्ना लाल गोयल यांच्या समर्थकांनी सिदिंया यांच्या ग्वाल्हेरमधील निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलनही केले. नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी सिंदिया स्वतः घराबाहेर आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांसह जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना शांत केले.

हे वाचा >> एका सिंदियामुळे दुसऱ्या सिंदियाला फायदा? यशोधरा राजे यांची निवडणुकीतून माघार, भाजपामध्ये खळबळ

इतर ज्या निष्ठावंतांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी मात्र शांत राहण्याचा मार्ग स्वीकारला. त्यापैकी गिरिराज दंडोतिया (दिमनी), रणवीर जाटव (गोहद) आणि जसवंत जाटव (करेरा) यांचा समावेश आहे. या माजी आमदारांना मागच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.

काँग्रेसमध्ये परतलेल्या निष्ठावंतांनाही मिळाले तिकीट

काँग्रेसशी बंडखोरी करून सिंदिया यांच्यासह भाजपामध्ये गेलेले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या नेत्यानांही काँग्रेसने तिकीट देऊ केले आहे. बोधी सिंह भगत (कटंगी, बालाघाट), समंदर पटेल (जावद, नीमच) आणि बैजनाथ यादव (कोलारस, शिवपुरी) यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचे मंत्रिमंडळातील सहकारी प्रल्हाद पटेल (नरसिंगपूर), नरेंद्र सिंह तोमर (दिमनी) आणि फग्गन कुलस्ते (निवास) यांना विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे पक्षाने आदेश दिलेले असताना सिंदिया यांना मात्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले नाही. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनाही विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्याचवेळी त्यांचा मुलगा आणि इंदूरमधील तीन विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे.

“महाराजांचे चालले…”

सिंदिया यांच्या एका निष्ठावंतांने प्रतिक्रिया देताना म्हटले, “महाराजांचेच अखेर चालले आहे. (सिंदिया यांनी जे ठरविले, ते पूर्ण केले) आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना तिकीट मिळवून देण्यात सिंदिया यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या गटातील एकही प्रमुख नेता मागे राहिला नाही. महाराज स्वतः विधानसभा निवडणुकीत उतरत नाहीत, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कोणताही धोका नाही. मोदी आणि अमित शाह यांच्याकडे महाराजांसाठी मोठ्या योजना आहेत.”

आणखी वाचा >> सिंदिया यांच्यामुळे भाजपाचे नुकसान? आतापर्यंत भाजपाच्या चार नेत्यांनी पक्ष सोडला

भाजपाच्या नेत्याने सांगितले की, आमची यादी ही जिंकणाऱ्या उमेदवारांची आहे. आम्ही वय किंवा इतर घटकांचा विचार केलेला नाही. तर ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, फक्त तिकीट मिळवून देऊन सिंदिया धोक्यातून बाहेर पडत नाहीत. आता त्यांचा निष्ठावंतांना विजय मिळवावा लागेल. नाहीतर त्यांच्या कारकिर्दीवर संकट निर्माण होऊ शकते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotiraditya scindia loyalists across madhya pradesh got the assembly election tickets kvg
Show comments