देशातील चार मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यापैकी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर तेलंगणात काँग्रेस हा पक्ष विजयी झाला आहे. मध्य प्रदेशात भाजपाला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. अनेक अपेक्षा आणि अंदाजांच्या विपरीत भाजपाने मध्य प्रदेशात दोन तृतियांश जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मोठी मजल मारलेल्या काँग्रेससाठी हा धक्का होता. मध्य प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरू झाली आहे. अशातच या विजयावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा भाजपा कार्यकर्त्यांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा विजय असल्याचं मत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मांडलं. सिंधिया यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मराठीतून प्रतिक्रिया दिली. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व, त्यांची दूरदृष्टी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वामुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांची मेहनत फळाला आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम करतो. मी मध्य प्रदेशच्या जनतेचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशात आमचं बहुमताचं सरकार स्थापन होतंय.
ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, मी मध्य प्रदेशातील जनतेला आश्वस्त करतो की आम्ही राज्याच्या विकासाचं स्वप्न साकार करू. आम्ही मध्य प्रदेशची प्रगती करू, राज्यातली गरिबी नष्ट करू. या निवडणुकीच्या निकालातून ग्वाल्हेरचं वर्चस्वही दिसलं आहे. ग्वाल्हेर, चंबलच्या जनतेचेही मी आभार मानतो.
हे ही वाचा >> Video: तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव का झाला? निकालांचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!
यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ‘लाडली बहना’ योजनेचाही उल्लेख केला. ‘लाडली बहना’ योजना ही मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा परिपाक म्हणता येईल. शिवराज चौहान हे महिला मतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच, एप्रिल-मे मध्ये शिवराजसिंह यांनी महिला मतदारांना आकर्षित करणारी ‘लाडली बहना’ योजना लागू केली. गरीब कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा १ हजार रुपये जमा होऊ लागले. तीन-चार महिन्यांमध्ये योजनेची रक्कम १,२५० रुपये करण्यात आली. निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवराजसिंह यांनी ‘लाडली बहना’ योजनेच्या रकमेत ३ हजारांपर्यंत वाढ करण्याचे आश्वासन दिले. या योजनेमुळे महिलांना दरवर्षी ३६ हजार रुपये मिळू शकतील. शिवराजसिंह यांना मध्य प्रदेशात ‘मामा’ म्हणून ओळखले जाते. मामांच्या आश्वासनावर महिला मतदारांनी विश्वास ठेवून भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसते.