तेलंगणात तिसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) काँग्रेसनं मोठा धक्का दिला आहे. तेलंगणात काँग्रेस ६० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, बीआरएस ४० जागांवर आघाडीवर दिसत आहे. काँग्रेसची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. यातच बीआरएसचे नेते, के.टी रामाराव यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे.

‘एक्स’ अकाउंटवर के.टी रामाराव म्हणाले, “सलग दोनवेळा बीआरएसचे सरकार निवडून दिल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार व्यक्त करतो. आजच्या निकालाबद्दल दु:खी नाही. पण, निश्चितपणे निराश झालो आहे. कारण, हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. मात्र, या निकालातून धडा घेऊन आणि पुन्हा ताकदीने उभारू.”

“काँग्रेसला मिळालेल्या बहुमताबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा,” असं के.टी रामाराव यांनी म्हटलं आहे.

के.टी रामाराव यांच्या ट्वीटवर रेवंत रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “के.टी रामाराव यांची ही भावना आता सरकार चालवताना राहिली पाहिजे. कारण, १० वर्षे झाले तुम्ही सरकारमध्ये होता. आता विरोधी पक्षात बसणार आहात. धोरणे आम्ही बनवणार, सूचना देण्याचं काम विरोधी पक्षाचं असणार आहे. गरिब लोकांच्या मदतीसाठी काँग्रेस नेहमी प्रयत्न करणार आहे,” असं रेवंत रेड्डींनी सांगितलं.

Story img Loader