Ganpat Gaikwad in Kalyan East Assembly Constituency : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. २००८ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या रचनेत या मतदारसंघाची निर्मिती झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेतील काही वॉर्ड येतात. तर, गणपत गायकवाड हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

कल्याण पूर्वेत गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड २००९ पासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. २००९, २०१४, २०१९ असे तीन टर्म म्हणजेच तब्बल पंधरा वर्षे त्यांनी कल्याण पूर्वेत काम केलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनाच तिकिट मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीतून अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. पण या मतदारसंघावर भाजपाने दावा केला असून गणपत पाटीलच उमेदवार असतील असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा >> Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!

कल्याण पूर्व मतदारसंघात विधानसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. अनेक इच्छुक या मतदारसंघात उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी या मतदारसंघावर शिवसेना दावा करत असली तरी भाजपा हा मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. अनेक वर्ष गणपत गायकवाड हेच कल्याण पूर्व मतदारसंघात निवडून येतात. जनतेला ते आपलाच माणूस वाटतात. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच या मतदारसंघाचे पुन्हा नेतृत्व करतील याविषयी जनता, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे साहजिक आहे, असे मंत्री चव्हाण म्हणाले.

लोकसभेत महायुतीत झाली होती बिघाडी

तसंच, गणपत गायकवाड तुरुंगात असले तरीही तेच या भागाचे उमेदवार आणि आमदार असतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना समर्थन देण्यास नकार दिला होता. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता होती. आमदार गायकवाड यांची कल्याण पूर्वेत लाखांहून अधिक मते आणि त्यांचे समर्थक आहेत. ही मते महायुतीच्या उमेदवाराला पडली नाहीत तर मोठी गडबड होऊ शकते हा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधून आमदार गायकवाड समर्थकांशी संवाद साधला होता. त्यांची भूमिका ऐकून घेतली होती. आपणास नरेंद्र मोदी यांचा पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. राष्ट्र विचार हा भाजपामध्ये प्रथम आहे. त्यानंतर पक्ष आणि व्यक्ति विचार आहे, असे पटवून सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करायचे आहे, असे आमदार गायकवाड समर्थकांना मंत्री चव्हाण यांनी पटवून सांगितले. त्यानंतर गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार केला. या निर्धारामुळे श्रीकांत शिंदे यांना विजयी होण्यास हातभार लागला होता.

महायुतीकडून गणपत गायकवाड यांचा चेहरा जवळपास निश्चित झाला आहे. परंतु, महाविकास आघाडीकडून येथून कोणाला उमेदवार मिळते? या जागेवर कोण दावा करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही जागा बळकावयची असेल, भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावायचा असेल तर महाविकास आघाडीला या जागेवरून तितकाच तगडा उमेदवार उभा करावा लागणार आहे.