Kalyan Rural Vidhan Sabha Constituency : कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा कल्याण विधानसभा मतदारसंघातून विभागून झाला आहे. २००८ साली झालेल्या विभाजनात कल्याण ग्रामीण मतदारसंघाची निर्मिती झाली. ठाणे जिल्ह्याच्या ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकेचे आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे काही वॉर्ड या मतदारसंघात मोडतात. मनसेचे राजू पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून मनसेचे हे एकमेव आमदार आहेत.

कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. २००९ सालापासून येथे विविध पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहेत. मनसेचे रमेश रतन पाटील २००९ साली आमदार होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर जिंकून आले. तर, २०१९ मध्ये पुन्हा एकदा मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी सत्ता काबिज केली. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा >> Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!

मनसेकडून राजू पाटीलच?

मनसेकडून पुन्हा एकदा राजू पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. शिंदे गटाकडून अद्याप कोणतंही नाव चर्चेत आलं नसून महायुतीत ही जागा कोणाला मिळतेय हे पाहावं लागणार आहे.

शिवसेनेतील फूट सुभाष भोईरांच्या पथ्यावर?

दरम्यान ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार सुभाष भोईर यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. कारण, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचं तिकिट कापण्यात आलं होतं. त्यामुळे ते पक्षावर नाराज होते. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटात राहणंच पसंत केलं.

महायुतीतून कोण?

दरम्यान, या जागेवरून महायुती काय निर्णय घेते हे महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीत ही जागा कोणत्या पक्षाला जातेय, त्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावर पुढची सर्व गणितं अवलंबून आहेत.

कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गातील मतदासंघ असू २०१९ च्या निवडणुकीत कल्याण मनसे आणि शिवसेना अशी दुहेरी लढत प्रामुख्याने झाली होती. यामध्ये राजू पाटील यांना ९३ हजार ९२७ मते मिळाली होती. तर, शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ८६ हजार ७७३ मते मिळाली होती. रमेश म्हात्रे यांच्या फार थोड्या फरकाने पराभव झाला होता. तर, इथं एकूण ४७.९६ टक्के मतदान झालं होतं. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघही महत्त्वाचा मानला जातोय. कारण, या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासाठी चांगले मतदान झाले होते. याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. परंतु, ही जागा भाजपाकडे जाते की शिवसेनेकडे जाते हे पाहावं लागणार आहे.