Madhya Pradesh Election News : मध्य प्रदेश, छत्तीसगडसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापाठोपाठ वेगवेगळ्या पक्षांनी निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही रविवारी (१५ ऑक्टोबर) मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांमधील उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसने यावेळी काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तसेच काही जुन्या नेत्यांचं तिकीट कापलं आहे. यावरुन मध्य प्रदेश काँग्रेसमधील वातावरण तापलं आहे. विधानसभेचं तिकीट कापल्याने काही नेत्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी थेट पक्षश्रेष्ठी आणि मध्य प्रदेश काँग्रेसमधील वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते वीरेंद्र रघुवंशी यांचं तिकीट कापल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि वीरेंद्र रघुवंशी यांच्या समर्थकांनी थेट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नाराज कार्यकर्त्यांसमोर बोलताना कमलनाथ यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कमलनाथ यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओ भाजपा नेते समाजमाध्यमांवर व्हायरल करू लागले आहेत.
या व्हिडीओत कलमनाथ वीरेंद्र रघुवंशी यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना दिसत आहेत. कमलनाथ म्हणाले, वीरेंद्रबद्दल वाईट वाटलं, शिवपुरीबाबत तुम्ही दिग्विजय सिंह आणि जयवर्धन सिंह यांच्याशी बोला, मला तर वीरेंद्रच हवे होते. आता तुम्ही सगळे इथून जाऊन दिग्विजय सिंह आणि जयवर्धन सिंह यांचे कपडे फाडा.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कमलनाथ यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये मालवीय यांनी म्हटलं आहे की “कमलनाथ यांचा कार्यकर्त्यांना सल्ला, तुम्ही जाऊन दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांचे कपडे फाडा. काँग्रेसमध्ये राजस्थानपासून ते छत्तीसगडपर्यंत नेत्यांमधल्या भांडणात जनता भरडली जात आहे. यांना सत्तेपासून दूर ठेवणं हाच यावरचा योग्य उपाय आहे.”
नेमकं प्रकरण काय?
कोलारसचे विद्यमान आमदार वीरेंद्र रघुवंशी यांना यावेळी काँग्रेसने कोलारस या मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही. तसेच ते यावेळी शिवपुरीमधून उमेदवारी मिळेल या अपेक्षेत होते. परंतु, त्यांच्याऐवजी पिछोरचे विद्यमान आमदार के. पी. सिंह यांना शिवपुरीमधून तर कोलारसमधून बैजनाथ यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, के. पी. सिंह यांच्या पिछोर मतदारसंघातून शैलेंद्र सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वीरेंद्र रघुवंशी यांचे समर्थक कमलनाथ यांना भेटायला गेले. तसेच त्यांनी कमलनाथ यांना चढ्या आवाजात जाब विचारला. त्यामुळे संतापलेले कमलनाथ म्हणाले, मला विरेंद्रलाच उमेदवारी द्यायची होती. तुम्ही इथून जा आणि दिग्विजय सिंह आणि जयवर्धनचे कपडे फाडा.