मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तर तेलंगणा या एकमेव राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा पराभव झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या निकालांनुसार तेलंगणातील ११९ जागांपैकी काँग्रेस ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर बीआरएस ४० जागांवर आघाडीवर आहे. भाजपाला केवळ ८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तेलंगणात भाजपाचा मोठा पराभव झाला असला तर भाजपासाठी एक चांगली बातमी या निकालातून मिळाली आहे. कामारेड्डी मतदारसंघात भाजपा उमेदवार कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी हे आघाडीवर आहेत. रमना रेड्डी यांनी या मतदारसंघात दोन मोठ्या उमेदवारांना मागे टाकलं आहे. के. व्ही. आर रेड्डी यांनी या मतदारसंघात तेलंगणाचे विद्यमान उमेदवार के. चंद्रशेखर राव यांना आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अनुमुला रेवंत रेड्डी यांना मागे टाकलं आहे. केव्हीआर रेड्डी हे ४२७३ मतांनी पुढे आहेत.

तेलंगणातील कामारेड्डी मतदारसंघातील मतांची मोजणी सुरू आहे. १६ व्या फेरीनंतर कामारेड्डी मतदारसंघात केव्हीआर रेड्डी ६१,०३७ मतांसह सर्वात पुढे आहेत. तर मुख्यमंत्री केसीआर ५६,७६४ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रेवंत रेड्डी हे ५२,७५० मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे केव्हीआर रेड्डी हे कामारेड्डी मतदारसंघात जायंट किलर ठरू शकतात. एकाच मतदारसंघात आजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्याची किमया केव्हीआर रेड्डी करतील असा विश्वास भाजपा समर्थकांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> “मर्द कोण हे कळलं का?” भाजपाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; राहुल गांधींवर टीका करत म्हणाले, “पनवती…”

तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी ७०.२८ टक्के मतदान झालं. राज्यभरात ३५ हजार ६५५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. तर तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा ६० आमदार निवडून आणणं गरजेचं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेस बहुमतासह सत्ता स्थापन करू शकते. २०१४ साली तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून तेलंगणाची सत्ता बीआरएसच्या ताब्यात आहे. तसेच, राज्याच्या निर्मितीपासून केसीआर हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. परंतु, एक्झिट पोलचे अंदाज सध्या खरे ठरत असून काँग्रेसने तेलंगणात बहुमत मिळवलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamareddy constituency katipally venkata ramana reddy surprise lead against kcr revanth reddy asc