Kangana Ranaut : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होता. महाराष्ट्रात काय होणार याचे विविध अंदाज लढवले जात होते, तसंच एक्झिट पोल्सनीही त्यांचे अंदाज वर्तवत महायुतीला यश मिळेल असं म्हटलं होतं. मात्र एक्झिट पोल्सने जे अंदाज वर्तवले ते साधारण १६० जागांपर्यंत होते. काही एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असंही म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. महायुतीला २३९ जागांवर विजय मिळाला आहे. यानंतर खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला असं कंगनाने ( Kangana Ranaut ) म्हटलं आहे.
विरोधकांनी नेमकं काय म्हटलं आहे?
महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ते गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्राऐवजी गुजरातला शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. शिवतीर्थावर शपथविधी सोहळा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. तसंच वानखेडे स्टेडियमवर शपथविधी झाला तर तो महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं, त्यामुळे आणण्यात आलं आहे आणि लादण्यात आलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनीही या निकालावर संशय व्यक्त केला असून काँग्रेसनेही निकालावर प्रतिक्रिया देताना संशय व्यक्त केला आहे. हा निकाल मॅनेज करण्यात आला आहे असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे. यानंतर आता भाजपा खासदार कंगना रणौतची ( Kangana Ranaut ) प्रतिक्रिया समोर आली आहे.
कंगनाने काय म्हटलं आहे?
आमच्या भाजपा या पक्षासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि उत्साह वाढवणारा क्षण आहे. महाराष्ट्राचे आम्ही आभार मानतो. भारताच्या जनतेचेही मी आभार मानते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होईल याचा फैसला पक्ष करेल. आमच्याकडे अनेक दिग्गज लोक आहेत ते याबाबतचा निर्णय घेतील. उद्धव ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा जो पराभव झाला तो अपेक्षित होता कारण दैत्यांचा पराभव होतो हे आपण इतिहास आणि पुराणांमधून पाहिलं आहे. असं कंगनाने ( Kangana Ranaut ) म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या दैत्यांचा पराभव झाला-कंगना
दैत्य आणि देवता यांना आपण कसं ओळखतो? तर जे महिलांचा सन्मान करत नाहीत ते दैत्य असतात. महिलांना जे सन्मान देतात ते देव असतात. महिलांना ३३ टक्के आरक्षण असो किंवा इतर योजना असोत त्या चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या आहेत, जात आहेत. दैत्यांचं जे होतं तेच या सगळ्या विरोधकांचं झालं आहे. दैत्यांचा पराभव झाला. महाभारतात सगळे एकाच कुटुंबातले होते. पण कौरव हरलेच तसं घडलं आहे.
माझं घर ज्यांनी तोडलं त्यांना फळ मिळालं असंही कंगनाने म्हटलं आहे. दैत्यांचा पराभव झाला, मला घाणेरडेपणाने बोललं गेलं, शिवीगाळ करण्यात आली. ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली त्यांना धडा मिळाला असं कंगनाने ( Kangana Ranaut ) म्हटलं आहे.