अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाने हिमाचल प्रदेशातल्या मंडीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. कंगना रणौत ही पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत तिने सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान होते त्यांना गायब करण्यात आलं असं वक्तव्य केलं होतं. तसंच देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं या वक्तव्याचं तिने समर्थन केलं होतं. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. कंगना गोमांस खाते अशी टीका तिच्यावर होताना दिसते आहे. त्यावर कंगनाने पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला होता की कंगना रणौत भाजपाची उमेदवार आहे आणि ती बीफ खाते. एवढंच नाही तर त्यांनी हा दावाही केला होता की कंगनाने स्वतः ही गोष्ट एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली होती की ती बीफ म्हणजेच गोमांस खाते आणि तिला ते खूप आवडतं. यानंतर कंगनावर चांगलीच टीका होऊ लागली होती. तिला ट्रोलही केलं गेलं. आता कंगनाने या सगळ्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांनीह यांनीही कंगनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि तिचा अर्धनग्न फोटोही पोस्ट केला होता. त्यावरुन झालेला वाद शमलेला असतानाच तिच्यावर बीफ खात असल्याचा आरोप झाला. ज्यावर कंगनाने स्पष्टीकरण दिलं आहे.
हे पण वाचा- कंगना रणौत म्हणते त्याप्रमाणे खरंच, नेहरू नाही तर सुभाषचंद्र बोस होते का भारताचे पहिले पंतप्रधान?
काय आहे कंगनाचं म्हणणं?
मी गोमांस किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. ही बाब लज्जास्पद आहे की माझ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. मी गेल्या काही दशकांपासून योग आणि आयुर्वेदिक जीवनशैली अंगिकारली आहे. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. मात्र मला याने काही फरक पडणार नाही. माझी प्रतिमा कलंकित करण्यासाठी मी गोमांस खाते असा प्रचार केला जातो आहे. मात्र मी हे सांगू इच्छिते की मी एक स्वाभिमानी हिंदू आहे. माझ्याविषयी दिशाभूल करणारी वक्तव्यं करुन काहीही होणार नाही जय श्रीराम! अशी पोस्ट कंगनाने केली आहे.
कंगनाने हे पोस्ट केल्यानंतर २०१९ मध्ये तिनेच केलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये गोमांस खाणं काहीही गैर नसल्याचं कंगना म्हणाली होती. अनेक युजर्स ही पोस्ट तिला रिप्लाय म्हणून देत आहेत. आता यावर कंगना काही बोलणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.