Kangana Ranaut Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज (१८ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. भारतीय जनता पार्टीने त्यांचे देशभरातील स्टार प्रचारक या निवडणुकीत भाजपा व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरवले होते. बॉलिवूड अभिनेत्री व खासदार कंगना रणौत या देखील भाजपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसल्या. दरम्यान, रविवारी (१७ नोव्हेंबर) त्या एका उमेदवाराच्या प्रचारफेरीत सहभागी झाल्या होत्या. मात्र त्या नेमक्या कोणत्या उमेदवारासाठी तिथे आल्या आहेत हेच त्यांना माहिती नव्हतं असं पाहायला मिळालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा उमेदवाराच्या प्रचारफेरीत कंगना रणौत सहभागी झाल्या होत्या. यावेळी उमेदवार त्यांच्या शेजारी उभा होता. त्याचवेळी कंगना यांनी त्यांच्या सहाकाऱ्याला विचारलं की “हे गृहस्थ कोण आहेत?” त्यावर त्यांच्या सहकारी महिलेने सांगितलं की हेच तर उमेदवार आहेत. काँग्रेसने कंगना रणौत यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमुळे कंगना रणौत ट्रोल होऊ लागल्या आहेत.

हे ही वाचा >> “आजच्याइतकी हतबुद्धता कधीही…”, अभिनेते अतुल कुलकर्णींची राजकीय स्थितीवर टोकदार भाष्य करणारी कविता!

प्रचारतोफा आज थंडावणार

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा केंद्रस्थानी राहिलेला विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावतील. प्रचार थांबल्यानंतर विविध पक्षांकडून होणाऱ्या छुप्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष असेल.

आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराची पातळी यंदा फारच खालावल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवण्यात आलं. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि प्रचाराची रंगत वाढत गेली. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भातलं वातावरण तापवलं. त्यापाठोपाठ राज्यातील प्रचाराची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला. मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या या दोन घोषणांभोवती प्रचाराची दिशा फिरू लागली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दोन घोषणांवरून भाजपावर हल्लाबोल केला. तर भाजपा व शिवसेनेने (शिंदे) या घोषणा उचलून धरल्या. भाजपाला देशाचे तुकडे करायचे आहेत, अशी टीका विरोधकांनी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ हैं’ या दोन घोषणांचा प्रचारसभांमध्ये समाचार घेतला. विशेष म्हणजे महायुतीचे घटक असले तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या घोषणेशी सहमत नसल्याचं जाहीर केलं. ‘बटेंगे आणि सेफ है’ या दोन घोषणांमुळे मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. दुसरीकडे, या घोषणांच्या आधारे विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यावर महाविकास आघाडीने भर दिला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut forgot candidate as she campaigning asks whos he video shared by congress asc