कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. असे असताना वेगवेगळ्या समाजाची मतं मिळवण्यासाठी प्रादेशिक तसेच काँग्रेस आणि भाजपासारख्या पक्षांकडून प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकमध्ये राजकारण आणि मतांच्या दृष्टीकोनातून लिंगायत समाजाला फार महत्त्व आहे. याच कारणामुळे संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वच पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी बसवेश्व महाराजांना अभिवादन केले आहे.
बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास ट्वीट केले आहे. “मी जगद्गुरु बसवेश्वर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करतो. त्यांच्या विचारांमुळे मानवजातीची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी सशक्त आणि समृद्ध समाजनिर्मितीसाठी प्रयत्न केले. तसेच समाजातील मागसलेल्या लोकांसाठीही त्यांनी काम केले,” असे नरेंद्र मोदी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील बसवेश्वर महाराजांना अभिवादन केले.
हेही वाचा>> १२ तासांची शिफ्ट, आठवड्याला ३ दिवसांची सुट्टी; तामिळनाडूच्या विधेयकावर टीका झाल्यानंतर कामगार संघटनांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्वीटवर मूळचे कर्नाटकचे नेते प्रल्हाद जोशी यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली. “बसवण्णा यांनी दिलेल्या मानवतावादी मूल्यांची प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी नव्या भारताच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक सशक्त आणि सुंदर समाज निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रल्हाद जोशी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ट्वीटद्वारे तसेच सभेत बोलताना संत बसवेश्वर यांना अभिवादन केले. “गुरू बसवण्णाजी यांच्या जीवन म्हणजे बंधूभाव आणि करुणा आहे. त्यांनी अविरतपणे न्याय आणि प्रत्येकाला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले,” असे राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर सभेमध्ये बोलतानादेखील त्यांनी बसवेश्वर महाराजांवर भाष्य केले. “बसवेश्वर महाराजांनी भारताला तसेच जगाला लोकशाहीचा रस्ता दाखवून दिला असून ते सत्य आहे. देशात जर लोकशाही आली असेल, लोकांचे अधिकार आले असतील तर त्याची पायाभरणी बसवेश्वर महाराजांसारख्या महान व्यक्तींनी केलेली आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा>> Loksabha Election 2024 : ईदनिमित्त खास भाषण, मोदी सरकारवर हल्लाबोल; मुस्लीम मतांवर ममता बॅनर्जींचा डोळा!
कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीदेखील संत बसवेश्वर यांना अभिवादन केले. बसवराज बोम्मई यांनी बंगळुरुमधील विधानसभा परिसरात असलेल्या संत बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तर येडियुरप्पा यांनी ट्वीटद्वारे बसवेश्वर महाराजांना अभिवादन केले. “सामाजिक, धार्मिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणणाऱ्या बसवेश्वर महाराजांना मी अभिवादन करतो,” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या.