विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी नुकतेच भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने त्यांनी हुबळी-धारवाड मध्य या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होणार आहे. भाजपाने येथून महेश तेंगिनाकायी यांना तिकीट दिले आहे. तेंगिनाकायी हे भाजपा पक्षाचे एकनिष्ठ नेते मानले जातात. त्यामुळे नुकतेच भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले शेट्टर आणि पक्षनिष्ठा जपणारे महेश तेंगिनाकायी यांच्यात कोण बाजी मारणार अशी चर्चा कर्नाटकमध्ये रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगदीश शेट्टर हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवणार

जगदीश शेट्टर मागील अनेक वर्षांपासून भाजपा तसेच संघ परिवारातील महत्त्वाचे नेते होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तिकीट नाकारण्यात आले. जगदीश शेट्टर हे लिंगायत समाजाचे असून या समाजाचा त्यांना चांगला पाठिंबा आहे. याच कारणामुळे काँग्रेसने त्यांनी हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून तिकीट दिले आहे. २००८ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती. तेव्हापासून काँग्रेस पक्ष येथे विजय मिळवू शकलेला नाही. मात्र शेट्टर यांच्या रुपात येथून पहिला विजय मिळण्याची काँग्रेसला आशा आहे.

हेही वाचा >> चायत राज दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका; तर काँग्रेसकडून राजीव गांधींच्या योगदानाची उजळणी

निवडणूक कोण जिंकणार?

तर दुसरीकडे भाजपाने पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले महेश तेंगिनाकायी यांना तिकीट दिले आहे. ते सध्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. हुबळी-धारवाड मध्ये मतदारसंघातील बहुतांश मतदार उमेदवार कोण आहे? याचा विचार न करता पक्षाला समोर ठेवून मतदान करतात. या मतदारसंघात भाजपाला चांगला जनाधार आहे. याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न तेंगिनाकायी करणार आहेत.

येथील मतदारांना काय वाटतं?

या निवडणुकीबाबत येथील काही मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वासावीनगर येथील शंकर रावल यांनी भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरते. त्यामुळे आम्ही उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता थेट भाजपाला मत देऊ, असे सांगितले. तर काही मतदारांना भाजपा पक्षाकडून कोणता उमेदवार उभा आहे, याची माहिती नाही. आम्हाला जगदीश शेट्टर यांच्याबाबत माहिती आहे. मात्र आमच्या बाजूने जो उमेदवार उभा राहील, त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत. भाजपाने येथून कोणत्या उमेदवाराला तिकीट दिलेले आहे, याची आम्हाला कल्पना नाही, असे मत अरुणाम्मा या मतदाराने व्यक्त केले. तर काही मतदारांना हुबळी-धारवाड मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे, असे वाटत आहे. या दोन मतदारांपैकी कोणाचा विजय होणार, हे अद्याप सांगता येणार नाही. येथे चुरशीची लढत होणार आहे, असे विरेश पाटील या मतदाराला वाटते.

हेही वाचा >> बीजेडी पक्षाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, ३ मजली इमारतीत ओडिसाच्या विकासाचे दर्शन!

राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी शेट्टर विमानतळावर पोहोचले

शेट्टर लिंगायत समाजाचे असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना काँग्रेस प्रमुख नेत्यांपैकी एक नेते असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचे स्वागत करणाऱ्या नेत्यांमध्ये शेट्टर यांचाही समावेश होता. काँग्रेसने नंतर राहुल गांधी आणि शेट्टर यांचा फोटोही ट्वीट केला होता.

हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात ७५ हजार लिंगायत मतदार

हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात एकूण २.२ लाख मतदार आहेत. या मतदारांमध्ये लिंगायत समाजातील मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे साधारण ७५ हजार लिंगायत, ५० हजार मुस्लीम, ३० हजार अनुसूचित जाती, २५ हजार क्षत्रिय, २० हजार ब्राह्मण समाजाचे मतदार आहेत.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती पण स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पोकळी

शेट्टर यांच्या विजयाचा आलेख काय सांगतो?

मागील तीन विजयांमध्ये शेट्टर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केलेला आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश नालवाड यांचा २१ हजार मतांनी पराभव केला होता. २०१३ सालच्या निवडणुकीत १८ हजार तर २००८ च्या निडणुकीत १६ हजार मतांच्या फरकाने शेट्टर यांनी विजय मिळवला होता.

भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची

भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या जागेवरील भाजपाचे उमेदवार महेश तेंगिनाकायी यासह मूळचे कर्नाटकचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसेच कर्नाटकमधील भाजपाचे बडे नेते बीएल संतोष यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीएल संतोष यांच्यामुळेच मला भाजपाने तिकीट नाकारले, असा आरोप शेट्टर यांनी केला होता. याच कारणामुळे भाजपा या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅली, सभांचे आयोजन करणार आहे.

हेही वाचा >> निवडणूक आयोगाकडून काँग्रेस नेते शिवकुमार, भाजपाचे अन्नामलाई यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; राज्यात २५३ कोटींची रोकड जप्त

शेट्टर यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी

तर दुसरीकडे शेट्टर यांना ऐनवेळी तिकीट दिल्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. काँग्रेसचे नेते रजथ उल्लगडीमाथ यांना या जागेवर तिकीट मिळणार होते. मात्र ऐनवेळी शेट्टर यांना तिकीट देण्यात आले. याच कारणामुळे ते नाराज आहेत. शेट्टर यांना तिकीट जाहीर होण्यापूर्वी मी मोठ्या जल्लोषात हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे जाहीर केले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते अल्ताफ किट्टूर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून येथून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस या बंडाला कसे थोपवणार तसेच भाजपा येथे विजय मिळवण्यासाठी कोणती खेळी खेळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election 2023 hubli dharwad central constituency jagadish shettar vs mahesh tenginkai prd