Karnataka Assembly Election 2023 : पैसे काय झाडाला लागतात का, असा प्रश्न आपल्या कानावर कधी तरी पडलेला असतोच. घरातील मोठी मंडळी किंवा कुणाकडे उसने मागितल्यास हमखास हे वाक्य ऐकायला मिळते. पण कर्नाटकमध्ये खरोखरच झाडावर पैसे मिळाले आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण कर्नाटकमध्ये झाडांवर, रिक्षामध्ये कोट्यवधींची बेहिशेबी रोकड सापडत आहे. आयकर विभागाने म्हैसूर प्रांतातील सुब्रहनिया राय यांच्या घरातून एक कोटींची रोकड जप्त केली आहे. राय हे पुत्तूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक कुमार राय यांचे बंधू आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना राय यांच्या घराबाहेर असलेल्या आंब्याच्या झाडावर एका पेटीत एक कोटींची रोकड मिळाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांपासून प्राप्तिकर विभागाकडून धाडसत्र राबविले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरु पोलिसांनी १३ एप्रिल रोजी सिटी मार्केट परिसरात एका रिक्षातून १ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली. निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केल्यापासून कर्नाटकमध्ये कागदपत्र आणि पुराव्याशिवाय मोठी रक्कम बाळगण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. मागच्या महिन्यात प्राप्तिकर विभागाने काँग्रेसचे माजी नेते गंगाधर गौडा आणि दक्षिण कन्नडमधील बेलथानगडी येथील शैक्षणिक संस्थेवर धाड टाकली होती. ही शैक्षणिक संस्था गंगाधर गौडा यांचे सुपुत्र रंजन गौडा यांच्याशी संबंधित आहे. या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी प्राप्तिकर विभागाने खासगी विकासक अंकिता बिल्डर्स आणि त्याचे मालक नारायण आचार्य यांच्या हुबळी येथील निवासस्थानी धाड टाकली होती.

गंगाधर गौडा यांनी २०१८ साली भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर गौडा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती.ॉ

हे वाचा >> निवडणूक आयोगाकडून काँग्रेस नेते शिवकुमार, भाजपाचे अन्नामलाई यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; राज्यात २५३ कोटींची रोकड जप्त

कर्नाटकमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर २९ मार्च रोजी आदर्श आचारसंहिता घोषित (Model Code of Conduct – MCC) करण्यात आली. विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी डोळ्यांत तेल घालून ठिकठिकाणी तपास आणि धडक कारवाई करीत आहेत. हे करीत असताना त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गाडीचीही तपासणी केलेली आहे. ३१ मार्च रोजी बोम्मई चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांची गाडी रोखून झडती घेण्यात आली.

२९ मार्चपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी २५३ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. सोने, भेटवस्तू, मद्य आणि अमली पदार्थांचा साठाही या काळात जप्त करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election 2023 one crore cash found on mango tree during it raid in mysuru kvg