येत्या १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असल्यामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपाकडून काँग्रेसवर सडकून टीका केली जात आहे. तर कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशन मागणारे सरकार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या आरोप प्रत्यारोपांच्या युद्धात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील उडी घेतली असून त्यांनी जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. प्रियांका गाधी यांच्या टीकेनंतर काँग्रेसने सोशल मीडियावर “CryPMPayCm” असा ट्रेंड चालवला आहे.
प्रियांका गांधी नेमके काय म्हणाल्या?
कर्नाटकमधील बागलकोट येथे प्रियांका गांधी एका सभेला संबोधित करत होत्या. या सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. “लोकांमध्ये येऊन रडणारे पंतप्रधान मी पहिल्यांदाच पाहात आहे. लोकांचे गाऱ्हाणे ऐकण्याऐवजी सध्याचे पंतप्रधान रडत आहेत. जनतेच्या समस्यांची यादी करण्याऐवजी पंतप्रधान कार्यालयातील कोणीतरी मोदी यांना आतापर्यंत किती वेळा शिवीगाळ झालेली आहे, याची यादी केली आहे. ही यादी एका पानावर मावत आहे. मात्र भाजपाने माझ्या परिवाराला केलेल्या शिवीगाळीची यादी केल्यास, अनेक पुस्तके छापावी लागतील,” अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
प्रियांका गांधी यांनी केलेल्या या टीकेनंत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हाच धागा धरून भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काही महिन्यांपर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. बोम्मई सरकारकडून ४० टक्के कमिशन मागितले जाते, असा आरोप करण्यात आला होता. हाच मुद्दा घेऊन सप्टेंबर २०२२ मध्ये “PayCM” असे कॅप्शन देत काँग्रेसने सोशल मीडियावर ट्रेंड चालवण्यात आला होता.
काँग्रेसचे राज्यसभेचे खसदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी प्रियांका गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “#CryPMPayCM ने कर्नाटकमधील लोकांच्या समस्या ऐकूण घेण्यास सुरुवात करायला हवी. लोकांच्या समस्या ऐकणे हाच ‘राजधर्म’ आहे. कर्नाटकच्या लोकांना जबाबदार लोक, उत्तरं देणारे तसेच भ्रष्टाचार न करणारे लोक हवे आहेत,” असे सुरजेवाला म्हणाले.
भाजपाच्या जाहीरनाम्यावरही काँग्रेसने टीका केली आहे. “भाजपाने २०१८ साली केलेल्या आश्वासनांपैकी ९० टक्के आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. आता कमिशन मागणाऱ्या भाजपाने नवा बोगस जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे,” अशी टीका काँग्रेसचे नेते श्रीवास्तव बीवाय यांनी केली आहे. काँग्रेसने २०१३-१८ या काळात दिलेल्या आश्वासनांपैकी ९० टक्के आश्वासनं पूर्ण केली आहेत, असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. “कर्नाटकच्या लोकांनी ४० टक्के कमिशन मागणाऱ्या भाजपा सरकारला पराभूत करावे. तसेच काँग्रेसच्या १०० टक्के वचनबद्ध असलेल्या सरकारला निवडून द्यावे,” असे खरगे म्हणाले.
खरगे यांचे पुत्र तथा कर्नाटकच्या छित्तापूर येथील आमदार प्रियांक खरगे यांनीदेखील भाजपावर सडकून टीका केली आहे. “विरोधकांनी किती वेळा नाव घेतले, हे मोजण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ आहे. मात्र कर्नाटकमधील ठेकेदारांच्या संघटनेने लिहिलेले पत्र वाचण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. या ठेकेदारांनी कर्नाटकमधील भाजपा सरकारकडून ४० टक्के कमिशन मागितले जाते, असा आरोप केला होता. मोदी मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका प्रियांक खरगे यांनी केला.
हेही वाचा : “जे पेराल, तेच उगवेल”, अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांची प्रयागराजमध्ये पहिलीच सभा
डीएमके पक्षानेदेखील हाच मुद्दा घेऊन भाजपावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी त्यांची गाऱ्हाणी मांडतात. माझा ९१ वेळा अपमान झाला, असा दावा मोदी करत आहेत. मात्र आमच्या कुटंबियांचा अपमान मोजल्यास अनेक पुस्तके प्रकाशित करावी लागतील, असे डीएमकेचे प्रवक्ते सर्वनन अण्णादुराई म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या या टीकेवर मुख्यमंत्री बसवराजी बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही रडलेले नाहीत. मात्र मागील ९ वर्षांपासून काँग्रेस पक्षच रडत आहे. मात्र लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही,” असे बोम्मई म्हणाले.