कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे १० दिवस उरले आहेत. यामुळे प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी तर, भाजपाकडून खुद्द नरेंद्र मोदी मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीची चुरस वाढली आहे. त्यातच, भाजपाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये शेतकरी, सामान्य नागरिक, व्यावसायिक यांना आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटकात जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्तेत आल्यास भाजपा दरवर्षी बीपीएल कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देणार आहे. युगाडी, गणेश चतुर्थी आणि दिवाळी या तीन सणांना हे सिलिंडर सरकारकडून मोफत असतील.

राज्यभर स्वस्त, दर्जेदार आणि सकस आहार देण्यासाठी भाजपा राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात ‘अटल आहार केंद्र’ सुरू करणार. तर, पोषण्णा योजनेअंतर्गत भाजपा बीपीएल कुटुंबांना प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध देणार आहे. तसंच, बीपीएल कुटुंबांना ५ किलो श्री अण्णा रेशन किट देण्यात येणार आहे.

भाजपाने कर्नाटकातही समान नागरी कायदा लागू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

भाजपा ‘सर्वारिगू सुरू योजना’ सुरू करणार आहे. याअंतर्गत महसूल विभाग बेघरांना राज्यभर १० लाख घरांचं वाटप करणार आहे.

भाजपा ‘ओनाके ओबव्वा सामाजिक न्याय निधी’ योजना सुरू करणार आहे. या योजनेचा फायदा एससी, एसटी कुटुंबातील महिलांना होणार आहे.

कर्नाटकातील नागरिकांचं आयुष्य सुधारण्याकरता ‘अपार्टमेंट ओनरशिप कायदा १९७२’ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसंच, कर्नाटक रहिवासी कल्याण सल्लागार समितिची स्थापनाही करण्यात येणार आहे.

भाजपा ‘विश्वेश्वरय्या विद्या योजना’ सुरू करणार आहे. या अंतर्गत राज्य सरकार सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्याकरता चांगल्या संस्थांसोबत करार करणार आहे.

भाजपाकडून ‘समन्वय’ योजना सुरू करण्यात येणार आहे. यामुळे SMEs आणि ITIs यांच्यात सहकार्य वाढेल. तसंच प्रतिभावान तरुण व्यावसायिकांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

भाजप इच्छुक तरुणांना आयएएस/ केएएस/ बँकिंग/सरकारी नोकऱ्यांसाठी कोचिंग घेण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देऊन करिअरसाठी मदत करेल.

‘मिशन स्वस्थ कर्नाटक’ च्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधांना बळकटी देण्यात येणार आहे. महापालिकांच्या प्रत्येक प्रभागात नम्मा क्लिनिकची स्थापना करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य वार्षिक आरोग्य तपासणी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

पुढच्या पिढीसाठी बंगळुरूला स्टेट कॅपिटल रिजन म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामार्फत एक व्यापक, तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली शहर विकास कार्यक्रम राबवला जाईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election bjp promises freebies including cooking gas cylinders milk in manifesto pledges to implement uniform civil code sgk