Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: आज देशभर कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय मंत्रीमंडळातील दिग्गज नेतेमंडळींनी कर्नाटकमध्ये जोरदार प्रचार केला होता. त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेसनंही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर तयार झालेल्या वातावरणात कर्नाटक भाजपाकडून परत घेण्यासाठी कंबर कसली. या पार्श्वभूमीवर आत मतमोजणीमध्ये सुरुवातीचे कल हाती येताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या मुलानं मोठा दावा केला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं. जवळपास ७२ टक्के मतदान झाल्यानंतर कौल कुणाच्या पारड्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली होती. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून राज्यात जोरदार प्रचारमोहिमा राबवण्यात आल्या. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. या कलांच्या आकडेवारीवर सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिद्र सिद्धरामय्या यांनी मोठा दावा केला आहे.
सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रीपद?
यतिंद्र सिद्धरामय्या यांनी त्यांचे वडील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असायला हवेत, असा दावा केला आहे. “भाजपाला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत. काँग्रेसला राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार आहे. शिवाय वरुणा मतदारसंघातून माझे वडीलही निवडून येतील”, असं यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले आहेत.
कर्नाटकमधील २२४ जागांसाठी मतदान पार पडलं असून बहुमतासाठी ११३ जागा मिळवणं कोणत्याही पक्षासाठी आवश्यक आहे. कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या २२२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी बहुमतापासून त्यांना दूर राहावे लागले. काँग्रेसने ७८ तर जेडीएसने ३७ जागा मिळवल्या होत्या. तर बहुजन समाज पक्ष १, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे इतर उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा आकडा ११२ असल्यामुळे २०१८ साली विधानसभा त्रिशंकू झाली होती.