Karnataka Assembly Election 2023 : निवडणूक आयोगाने शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि त्यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या खासगी हेलिकॉप्टरची तपासणी केली. शिवकुमार यांचे कुटुंबीय बंगळुरूहून दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या धर्मस्थला येथे चालले होते. धर्मस्थला मंजुनाथ स्वामी मंदिरात तीर्थयात्री म्हणून शिवकुमार यांचे कुटुंबीय आले होते. धर्मस्थला येथे हेलिकॉप्टर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी करायची असल्याचे सांगितले. या वेळी हेलिकॉप्टरच्या पायलटने याला विरोध केला. सदर हेलिकॉप्टर निवडणुकीच्या कामासाठी नसून खासगी दौऱ्यावर आहे. याची कल्पना आयोगालासुद्धा दिलेली असल्याचे पायलटने सांगितले. मात्र तरीही आयोगाचे अधिकारी तपासणी करण्यावर ठाम राहिले. सदर तपासणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर २९ मार्च रोजी आदर्श आचारसंहिता घोषित (Model Code of Conduct – MCC) करण्यात आली. विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी डोळ्यात तेल घालून ठिकठिकाणी तपास आणि धडक कारवाई करत आहेत. हे करत असताना त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गाडीचीही तपासणी केली. ३१ मार्च रोजी बोम्मई चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांची गाडी रोखून झडती घेण्यात आली.

हे वाचा >> Karnataka : काँग्रेसला १५० आणि भ्रष्ट भाजपाला केवळ ४० जागा मिळणार; निवडणुकीआधी राहुल गांधींचा दावा

२९ मार्चपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी २५३ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. सोने, भेटवस्तू, मद्य आणि अमली पदार्थांचा साठाही या काळात जप्त करण्यात आला आहे.

१७ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भाजपाचे नेते आणि कर्नाटक निवडणूक प्रभारी के. अन्नामलाई यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली. ते उडपी येथून दक्षिण कन्नड जिल्ह्यात प्रवास करत होते. कापू विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विनय कुमार सोरके यांनी अन्नामलाई यांच्यावर रोख रक्कम हेलिकॉप्टरमधून नेल्याचा आरोप केला होता. अन्नामलाई यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने निवेदन काढून सांगितले की, आम्ही उडपी आणि कापू येथे त्यांच्या हेलिकॉप्टर आणि गाड्यांची सहा वेळा तपासणी केली. मात्र त्यांनी नियमांचा भंग केल्याचे आढळून आले नाही.

हे ही वाचा >> कर्नाटकातील भाजपच्या उत्साही नेत्यांना अमित शहा यांनी लावला चाप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान राज्यातील विविध चेकपोस्टवर तैनात करण्यात आले आहेत. निवडणुकीत बेहिशेबी पैशांचा वापर होणार नाही आणि निवडणुकीला कलंक लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षांचे नेते हेलिकॉप्टरने प्रवास करण्याला प्राधान्य देतात, त्यामुळे या वेळी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरचीदेखील कसून तपासणी सुरू केली आहे.

निवडणूक आयोग धाडसत्र राबवत असताना भाजपाचे उमेदवार आणि राज्य मंत्री मुरुगेश निरानी यांच्या शासकीय निवासस्थानी २१.४५ लाख किमतीचे ९६३ पारंपरिक चांदीचे कंदील शुक्रवारी जप्त करण्यात आले. मतदारांना आमिष देण्यासाठी हे कंदील गोळा केल्याच्या आरोपाखाली निरानी यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम १७१ एच (निवडणूक काळात बेकायदेशीररीत्या पैसे वाटणे)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election election commission checks choppers with congress shivakumar and bjp annamalai 253 crore cash seized