Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालाची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. काँग्रेसची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष सुरू केला. सत्तास्थापनेच्या हालचालीही सुरू झाल्या. मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या की शिवकुमार? अशी चर्चा एकीकडे सुरू झालेली असताना दुसरीकडे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी अंतिम निकाल हाती येण्याआधीच आपला पराभव मान्य केला असून सक्षम विरोधी पक्षाचा पर्याय राज्यात देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर हे कर्नाटकचे खासदार असून राज्यातील भाजपाचे महत्त्वाचे नेते मानले जातात. कर्नाटकमध्ये कल काँग्रेसच्या बाजूने जात असल्याचं दिसत असताना चंद्रशेखर यांनी पराभव मान्य असल्याची प्रतिक्रिया दिल्यामुळे दक्षिणेकडच्या एकमेव राज्यातूनही भाजपाला काढता पाय घ्यावा लागला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव दिसताच मुख्यमंत्री बोम्मईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींनी…”

काय म्हणाले राजीव चंद्रशेखर?

चंद्रशेखर यांनी कर्नाटकच्या जनतेचा निर्णय मान्य असल्याचं नमूद केलं आहे. “निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. कर्नाटक भाजपा या निवडणुकीत सहभाग घेतल्याबद्दल आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व मतदाराचे आभार मानते. मी व्यक्तिगतरीत्या आणि राज्यातील नेतृत्वही या निवडणुकांसाठी कठोर मेहनत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानतो”, असं ते म्हणाले.

“आम्ही मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करतो. आम्ही हा निकाल स्वीकारतो. आम्ही राज्याच्या विकासासाठी, लोकांसाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून समर्थपणे काम करू. या निवडणुकीत नेमकं काय चुकलं, यावर आम्ही काही काळानंतर बोलू शकू”, असंही राजीव चंद्रशेखर यावेळी म्हणाले.