कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी पार पडली जाणार आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांच्यात लढाई होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. त्यातच काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रेवडी संस्कृती’ म्हणत टीका केली होती. त्याला आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना ‘रेवडी संस्कृती’ म्हटलं आहे. भाजपासाठी हे पचवणं अवघड आहे. कारण, त्यांचा पक्ष तर ४० टक्के कमिशनवर विश्वास ठेवतो,” असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.
हेही वाचा : बंगालच्या न्यायमूर्तीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; ‘न्यायिक शिस्त’ राखण्यासाठी तातडीच्या सुनावणीत निर्णय
“पंतप्रधान सांगतात, की काँग्रेस दिलेली आश्वासने निवडणुकीनंतर पूर्ण करणार नाहीत. पंतप्रधानांनी खरे सांगितलं आहे. भाजपासाठी हे काम करणं अशक्य आहे. जे ४० टक्के कमिशन घेतात, ते अशा प्रकाराच्या योजना लागू करू शकत नाहीत,” असा टोला राहुल गांधींनी भाजपाला लगावला आहे.
“कर्नाटकात कोणाचं सरकार बनणार, हे लोकांनी ठरवायचं आहे. मागील वेळी तुम्ही सरकार निवडलं होतं. पण, भाजपाने आमदारांना खरेदी करत, तुमचं सरकार चोरून नेलं. त्यांनी फक्त सरकारच चोरलं नाहीतर, त्यानंतर प्रत्येक कामासाठी ४० टक्के कमिशन घेतलं,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
हेही वाचा : ‘विषारी’ टीकेनंतर खरगेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
“कर्नाटक सरकार ४० टक्के कमिशनसाठी ओळखलं जाते. बेल्लारी भ्रष्टाचाराचे केंद्र आहे. त्यामुळे बेल्लारीत आता बदल झाला पाहिजे. फक्त निवडणुकीत नाहीतर, तुमच्या आयुष्यातही बदल झाला पाहिजे,” असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.