Karnataka Nivadnuk 2023: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या-लेखिका सुधा मूर्ती त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे देशातील शाश्वत बदलांबाबत त्यांनी वेळोवेळी मांडलेली भूमिकाही चर्चेत असते. अशीच एक भूमिका सुधा मूर्ती यांनी आज बंगळुरूमध्ये मांडली. विधानसभा निवडणुकांसाठी आज कर्नाटकमध्ये मतदान होत असून येत्या १३ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. बंगळुरूमध्ये मतदान केल्यानंतर सुधा मूर्ती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवमतदारांचे कान पिळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकमध्ये आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या पहिल्या सत्रात मतदान कमी झाल्यामुळे बंगळुरूमध्ये मतदानासाठी निरुत्साह दिसल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अनेक मान्यवर मंडळींकडून मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुधा मूर्ती यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी तरुणांना खडे बोल सुनावले.

काय म्हणाल्या सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती यांनी मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या नवमतदारांना फैलावर घेतलं. “मी तरुणांना सांगेन की कृपया आमच्याकडे पाहा. आम्ही म्हातारे आहोत. पण तरी आम्ही सकाळी ६ वाजता उठलो. तयार झालो आणि इथे येऊन मतदान केलं. कृपया आमच्याकडून शिका”, असा सल्ला त्यांनी तरुण मतदारांना दिला.

विश्लेषण : कर्नाटकात जातींच्या समीकरणावरच निकालाचे गणित? कोणत्या जाती कुठे प्रभावी?

“मतदान हा लोकशाहीचा पवित्र हिस्सा आहे. जर मतदार नसतील, तर ती लोकशाहीच नाही. त्यामुळे तुम्ही मतदानाचा आदर करायला हवा. तुम्हाला बदल घडवायचा असेल, प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या हातातली सत्ता आचरणात आणायला हवी. हे तुमच्यावर अवलंबून आहे”, असंही त्या म्हणाल्या.

काय सांगते आकडेवारी?

कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे. या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka election 2023 sudha murthy appeals new voters in bengaluru pmw