कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाला फक्त ६६ जागांवर विजय मिळवता आला आहे. दरम्यान, बहुमताचा आकडा पार केल्यामुळे येथे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा तसेच धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांव्यतिरिक्त देशातील अन्य महत्त्वाच्या पक्षांनीदेखील आपले उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवले होते. मात्र काँग्रेस, भाजपा आणि धर्मनिरपेक्ष जनता दल वगळता कर्नाटकमध्ये अन्य पक्ष अपयशी ठरल्याचे दिसले. आम आदमी पार्टी (आप), बहुजन समाज पार्टी यांसारख्या पक्षांना तर नोटा (वरीलपैकी कोणताही उमेदवार नाही) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पार्टीला कर्नाटकच्या जनतेने नाकारले

मागील काही दिवसांपासून आम आदमी पार्टी या पक्षाची देशभरात चांगलीच चर्चा आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीनंतर या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आप पक्षाच्या सरकारने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये केलेल्या सुधारणांची देशभरात चर्चा होते. या पक्षाने पंजाब राज्य नुकतेच काबीज केले आहे. येथे आप पक्षाने ही निवडणूक जिंकली होती. या विजयानंतर आप पक्षाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. याच पार्श्वभूमीवर या पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. ठरल्याप्रमाणे या पक्षाने कर्नाटकच्या निवडणुकीत तब्बल २०९ उमेदवार उभे केले होते.

हेही वाचा >> Karnataka: २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या ‘१७’ आमदारांचे काय झाले? किती जिंकले, हरले?

आप पक्षाने दिले होते २०९ उमेदवार

या उमेदवारांच्या विजयासाठी आप पक्षांनी येथे स्टार प्रचारकांची फौज उभी केली होती. अरविंद केजरीवाल यांनीदेखील येथे प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. मात्र कर्नाटकच्या जनतेने आप पक्षाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. आप पक्षाच्या २०९ उमेदवारांपैकी एकही उमेदवार येथे निवडून आला नाही. या पक्षाला एकूण मतांपैकी फक्त ०.५८ टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे ‘नोटा’ या पर्यायाला आप पक्षापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. ‘नोटा’ला एकूण ०.६९ टक्के मते मिळाली आहेत.

आप पक्षाकडून आकर्षक आश्वासने

आप पक्षाने दिल्ली, पंजाब राज्याप्रमाणेच कर्नाटकमधील जनतेलाही आकर्षक आश्वासने दिली होती. यामध्ये शून्य भ्रष्टाचार, बेरोजगार तरुणांना तीन हजार रुपयांचा भत्ता, मोफत वीज, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अशा आश्वासनांचा यामध्ये समावेश होता. मात्र एवढी सारी आश्वासने देऊनही कर्नाटकमधील मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी या पक्षाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.

हेही वाचा >> Karnataka Election 2023 : ७ टक्के मते आणि ७० जागांचा फरक! ‘या’ कारणामुळे काँग्रेसचा विजय; पण भाजपाला कोणत्या प्रदेशात फटका? जाणून घ्या… 

बहुजन समाज पक्षालाही नाकारले

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षालादेखील कर्नाटकच्या जनतेने नाकारल्याचे पाहायला मिळाले. बीएसपी पक्षाला येथे ०.३१ टक्के मते मिळाली. मतांची एकूण संख्या १ लाख २० हजार ४३० एवढी आहे. अशीच स्थिती नितीशकुमार यांच्या यूनायटेड जनता दल, असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम, सीपीआय, सीपीआयएम या पक्षांची आहे. युनायटेड जनता दल पक्षाला ०.०० टक्के मते मिळाली आहेत. तर सीपीआय ०.०२, सीपीआयएम पक्षाला ०.०६ टक्के मते मिळाली आहेत.

राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा पराभव

शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. याच कारणामुळे हा पक्ष अन्य राज्यांत निवडणूक लढवून आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने कर्नाटकमध्ये एकूण ९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी कर्नाटकमध्ये जाऊन सभा घेतल्या होत्या. प्रचार केला होता. मात्र त्याचा फायदा झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी पक्षाला अवघे ०.२७ टक्के मते मिळाली आहेत. ही मते ‘नोटा’ या पर्यायापेक्षादेखील कमी आहेत.

हेही वाचा >> जनता दलाच्या पिछेहाटीबरोबरच देवेगौडा कुटुंबातच पराभवांची मालिका सुरू

काँग्रेस, भाजपा, जेडीएस पक्षाला किती मते?

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाने भाजपाला धूळ चारली आहे. येथे काँग्रेसचा १३५ जागांवर विजय झाला आहे. बहुमतासाठी ११३ जागांचा आकडा पार करणे गरजेचे आहे. हा आकडा पार केल्यामुळे येथे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाचा एकूण ६६ तर धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाचा १९ जागांवर विजय झाला आहे. दोन अपक्ष तर सर्वोदय कर्नाटक पक्ष, कल्याण राज्य प्रगती पक्ष या दोन पक्षांचा प्रत्येकी एका जागेवर विजय झाला आहे. भाजपाच्या मतांची टक्केवारी ३६ टक्के आहे. तर काँग्रेसला मिळालेली एकूण मते ४२.८८ टक्के आहेत. जेडीएस पक्षाला एकूण १३.२९ टक्के मते मिळाली आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka election results 2023 ncp aap party vote sharing below nota prd