Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने १३७ जागांवर आघाडी घेतल्यानंतर देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमवीर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनीदेखील आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जी पाच आश्वासने दिली होती, ती पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करू, असे विधान त्यांनी केले आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांना फाइव्ह गॅरंटी म्हटले होते. या गॅरंटीची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत काँग्रेसच्या गॅरंटीची कोणतीही वॉरंटी नसल्याची टीका केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या विजयानंतर ही पाच आश्वासने कोणती? याची कर्नाटका सोडून इतर राज्यांतील लोकांना उत्सुकता लागली आहे.

राहुल गांधी निकालानंतर काय म्हणाले?

दुपारच्या दरम्यान मतमोजणीचे कल जेव्हा स्पष्ट झाले आणि काँग्रेस बहुमताचा आकडा सहजरीत्या गाठणार हे कळल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती. गरिबांच्या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीला पराभूत केले. हेच पुढे प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांसोबत उभा राहिला. आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकाने उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकच्या गरीब जनतेला पाच आश्वासने दिली होती. आम्ही ही आश्वासने पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू.”

हे वाचा >> Karnataka : जुनी पेन्शन योजना, ७५ टक्के आरक्षण, बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासने

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून पाच आश्वासने दिली

१. ‘गृह ज्योती’अंतर्गत प्रत्येक घरासाठी २०० युनिटची वीज मोफत देण्यात येईल.
२. ‘गृह लक्ष्मी’ योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख असलेल्या महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्यात येतील.
३. ‘युवा निधी’ योजनेच्या माध्यमातून पदवीधर आणि पदविका घेतलेल्या बेरोजगार तरुणांना भत्ता देण्यात येईल.
४. ‘उचित प्रयत्न’ योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येईल.
५. ‘अन्न भाग्य’ योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो धान्य मोफत देण्यात येईल.

वॉरंटी संपलेली काँग्रेस गॅरंटी कसली देणार?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. “काँग्रेसची वॉरंटी आता संपलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गॅरंटीला अर्थ उरत नाही. काँग्रेस म्हणजे खोटेपणाची गॅरंटी, भ्रष्टाचाराची गॅरंटी, घराणेशाहीची गॅरंटी असून बाकी काही नाही. काँग्रेसची वॉरंटी आधीच संपलेली असताना, ते कोणत्याही गोष्टीची गॅरंटी कसे काय देऊ शकतात? जर आपल्याला देशाला प्रगतिपथावर न्यायचे असेल तर देशाला रेवडी कल्चर (जनतेला मोफत वस्तू देणे)पासून मुक्त करावे लागेल.”

Story img Loader