Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकातील भाजपाची सत्ता उलथवून लावण्यास काँग्रेसला यश मिळाल्याचं बोललं जातंय. दरम्यान अजूनही अधिकृत आकडेवारी आलेली नसली तरीही काँग्रेसचा विजय आणि भाजपाचा पराभव मान्य करण्यात आला आहे. तसंच, कर्नाटकच्या निकालाचा परिणाम देशभर होणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कर्नाटक हे महाराष्ट्राला लागूनच असलेले राज्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कर्नाटकच्या निकालाचा परिणाम जाणवेल अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजापा आमचा मित्र पक्ष आहे. जनमताचा कौल आणि त्याचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. त्याप्रमाणे जनमताचा आदर भाजपा आणि आम्ही केला आहे. एखाद्या राज्याचा निकाल यावर सर्व अनुमान बांधू शकत नाही. यापूर्वी २०१९ च्या आधी झालेल्या काही विधानसभा आणि पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळाला नव्हता. परंतु, २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपाने जिंकली आहे ही वास्तवता आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> Video : “बेकायदेशीर, घटनाबाह्य म्हणणाऱ्या लोकांना कालबाह्य करून टाकलं”, एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर प्रहार

ते पुढे म्हणाले की, “नुकत्याच भारत जोडो का तोडो यात्रा सुरू होती. त्यावेळी मेघालय, त्रिपुरा नागालँड या तीन राज्यातील निवडणुका भाजापने जिंकल्या आहेत. प्रत्येक राज्याचे प्रश्न, परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या राज्यावरून संपूर्ण देशाचं अनुमान काढणं म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखं आहे. या निवडणुकीचा परिणाम लोकसभेच्या निकालांवर होणार नाही. महाराष्ट्रावर तर नाहीच नाही. महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षांत कोमात गेलेलं सरकार पाहिलं आहे. आमचं सरकार गेल्या १० महिन्यांत जोमात काम करतंय. कोमात आणि जोमात यातील फरक जतनेला कळतो. महाराष्ट्रातील जनतेला काम करणारं सरकार पाहिजेत, घरी बसणारे लोक आवडत नाहीत. महाराष्ट्रातील लोक सूज्ञ आहेत. आमच्या पाठीशी जनता उभी राहिल आणि पुढचा कालावधीही जोमाने काम करू. पुढच्या कालावधीत अधिक वेगाने सरकार निर्णय घेईल. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका शिवसेना भाजपा महायुती पूर्ण ताकदीने लढेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान,  कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “पराभव कोणाचा, विजय कोणाचा हे सर्वांना माहितेय. दुसऱ्यांचं घर जळताना आपलं घर जळतंय ते विझवायचं सोडून दुसऱ्यांचं घर जळताना आनंद व्यक्त करणारी लोक आहेत. आसुरी आनंद घेणारी लोक आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की बेगामी शादीमे अब्दुल्ला दिवाना. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा काय अपेक्षा करणार. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहणाऱ्यातील ही जनता आहे”, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka election results will affect maharashtra too chief minister eknath shinde says the opinion of public opinion sgk
Show comments