Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल (८ मे) रोजी थंडावला. उद्या १० मे रोजी आता दक्षिणेतील सर्वात मोठ्या राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. भाजपाने आपली सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षरशः राज्य पिंजून काढले. मागच्या ४० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत नवीन सरकार निवडून देण्याचा कर्नाटकाचा ट्रेण्ड राहिला आहे. या वेळी हा ट्रेण्ड तोडून पुन्हा भाजपाचे सरकार कसे निवडून येईल, यावर भाजपाने जोर दिला. काँग्रेस आणि जेडीएसनेही अँटी इन्कम्बसीचा अंदाज बांधून प्रचार करण्यावर जोर दिला. जेडीएसचे नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला. सोमवारी प्रत्यक्ष प्रचार थांबला असला तरी स्थानिक पातळीवर तीनही पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्यांनुसार कर्नाटकात ५.२ कोटी पात्र मतदार आहेत. तर ९.१७ लाख नवमतदार आहेत, जे पहिल्यांदा मतदान करतील. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी राज्यात ५८ हजार २८२ मतदार केंद्रे उभारण्यात आली आहेत. २२४ जागांसाठी २,६१३ मतदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात महिलांची संख्या फक्त १८५ एवढी आहे.

हे वाचा >> Karnataka Election : कर्नाटकातील अर्ध्याहून अधिक जागांवर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षाही जास्त!

भाजपाने सर्व २२४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत, काँग्रेसने २२३ तर जेडीएसने २०७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय निवडणुकांचा अभ्यास आणि निरीक्षण करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ केले आहे. त्यापैकी काँग्रेसमध्ये ३१ टक्के, भाजपा ३० टक्के आणि जेडीएसमधील २५ टक्के उमेदवारांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

कोणत्या उमेदवारांकडे सर्वाधिक संपत्ती?

अनेक राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. ही संपत्ती काही हजार कोटींमध्ये आहे. भाजपाचे एम.टी.बी. नागराज लघुउद्योगमंत्री होते, त्यांनी १ हजार ६१४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. ते सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे १ हजार ३५८ कोटींची संपत्ती आहे. तर ३९ वर्षीय भाजपाच्या उमेदवार प्रिया क्रिष्णा या तिसऱ्या क्रमाकांच्या सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. गोविंदराजनगर मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या असलेल्या प्रिया यांच्याकडे १ हजार १५६ कोटींची संपत्ती आहे.

कर्नाटकमध्ये मागच्या ४० वर्षांत विद्यमान सरकार पुन्हा निवडून आलेले नाही. अँटी इन्कम्बसीचा ट्रेण्ड इतर राज्यांपेक्षा कर्नाटकमध्ये अधिक पाहायला मिळतो. या वेळी भाजपाने मात्र पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसून प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो आणि जाहीर सभांचा सपाटा लावला होता. त्यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि पुढारी कर्नाटकमध्ये ठाण मांडून बसले होते. तीच परिस्थिती काँग्रेसची होती. कर्नाटकची सत्ता दृष्टिपथात दिसत असल्यामुळे संपूर्ण गांधी कुटुंबीय प्रचारात उतरले होते. प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अनेक जाहीर सभा घेतल्या. त्यासोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकातीलच असल्यामुळे त्यांनीही त्यांच्या पद्धतीने प्रचाराची व्यूहरचना आखली होती.

भाजपाला बंडखोरीचे ग्रहण

भाजपाने यंदा अनेक जुन्या नेत्यांचे तिकीट कापल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला. लिंगायत नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी उमेदवार यादीत नाव नसल्याचे कळताच काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्याच प्रकारे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी देखील काँग्रेसमध्ये सामील झाले. या नेत्यांनी काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, खरगे यांच्यासह खांद्याला खांदा लावून भाजपाविरोधात प्रचार केला. या सर्वांचा परिणाम काय होतो? हे मात्र १३ मे रोजीच समजू शकेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka elections 2023 in numbers 5 crore 2 lakhs voters 58282 thousand polling stations 9 lakh first timers who will be win kvg