Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे २० दिवस राहिले आहेत. सत्ताधारी पक्ष भाजपाने अनेक ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट कापल्यानंतर भाजपामध्ये बंडाळी दिसून आली. त्याप्रमाणेच काँग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यामधला सुप्त संघर्ष आता उघड होत आहे. सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांचे तिकीट कापून डी. के. शिवकुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दोन दिवसांपूर्वीच २०१८ साली बंगळुरुच्या पुलकेशीनगर या मतदारसंघातून ८० हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून आलेले काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी या वेळी अपक्ष अर्ज दाखल केला. दोन वेळा आमदार राहिलेल्या श्रीनिवासमूर्ती यांनी काँग्रेसच्या तिकिटाची वाट पाहिली. पण उमेदवारी घोषित न झाल्यामुळे त्यांना अपक्ष अर्ज दाखल करावा लागला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निमंत्रणावरून श्रीनिवासमूर्ती यांनी २०१३ साली जेडीएस पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. श्रीनिवासमूर्ती यांना तिकीट मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठींसोबतही संवाद साधण्यात आला, मात्र सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने पुलकेशीनगर येथून ए. सी. श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यात आली. श्रीनिवास हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांचे निकटवर्तीय समजले जातात.
काँग्रेसने उमेदवारी डावलल्याबद्दल श्रीनिवासमूर्ती यांनी शिवकुमार यांना जबाबदार धरले. माझे तिकीट कापण्यासाठी माझ्याविरोधातील खोटा अहवाल तयार करण्यात आला. मतदारसंघातील वातावरण माझ्याविरोधात असल्याचे दाखवण्यात आले. हे साफ खोटे आहे. काँग्रेसमध्ये माझ्यासोबत फक्त सिद्धरामय्या आणि झमिर अहमद हे दोन नेते उभे राहिले, असेही त्यांनी सांगितले.
पुलकेशीनगरची घटना काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार असे दोन गट असल्याचे ताजे उदाहरण आहे. या दोन गटांमधील सुप्त संघर्ष हा १० मेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या दोन नेत्यांमधील वादावर पडदा टाकण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटक प्रभारी रणदीप सूरजेवाला यांनी दोन नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण उमेदवारी देण्यावरून दोन्ही नेत्यांमधील संघर्ष उघड होतच आहे. काँग्रेसमधील या अंतर्गत बेबनावाचा फटका पक्षाला बसला असून काँग्रेसच्या मूळ नेत्यांपेक्षा भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांचीच अधिक चर्चा होत आहे. लिंगायत समाजाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि माजी उपमुख्यंत्री लक्ष्मण सावदी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
पुलकेशीनगरप्रमाणेच कडूर मतदारसंघातही सिद्धरामय्यांच्या निष्ठावंताला वगळण्यात आले आहे. वायएसव्ही दत्ता यांनीदेखील जेडीएस पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांची एक ऑडिओ क्लिप वाहिन्यांवर व्हायरल झाली होती. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, “शिवकुमार यांचे नेतृत्व मान्य करणे माझ्यासाठी अवघड आहे. कडूरमधून कुणाला तिकीट द्यायचे हे सिद्धरामय्या ठरवतील. माझ्यासाठी त्यांचा शब्द अंतिम असेल. आमदार म्हणून जर मला विचाराल की, कुणाचे नेतृत्व मान्य करायला आवडेल. तर मी सिद्धरामय्या यांचेच नाव पुढे करेल.”
ही ऑडिओ क्लिप वाहिन्यांवर प्रदर्शित होताच, दुसऱ्याच दिवशी कडूरमधून दत्ता यांचे नाव उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आले. दत्ता हे ब्राह्मण समाजातून येतात. काँग्रेसने या ठिकाणाहून बी.एस. आनंद यांना तिकीट दिले, ते कुरुबा या ओबीसी समुदायातून येतात. सिद्धरामय्यादेखील याच जातीचे प्रतिनिधित्व करतात. कडूर मतदारसंघात कुरुबा समुदायाचे प्राबल्य अधिक आहे. दत्ता यांचे तिकीट कापल्यामुळे सिद्धरामय्या यांना अडगळीत टाकल्याचे यातून निदर्शनास येते. दत्ता आता पुन्हा जेडीएसच्या मार्गावर आहेत. जेडीएसमुळे वोक्कालिगा आणि इतर समुदायांचा पाठिंबा मिळेल, अशी शक्यता दत्ता यांना वाटते.
सार्वजनिक मंचावर सिद्धरामय्या आणि शिवकुमार एकत्र दिसतात. यामुळेच काँग्रेस पक्षश्रेष्ठी कर्नाटक काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नसल्याचे वारंवार सांगत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मी राज्यातील नेत्यांना सांगू इच्छितो की, कोण मुख्यंमत्री बनणार हे महत्त्वाचे नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकणे महत्त्वाचे आहे. निवडून आलेले आमदार आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील कुणाला मुख्यमंत्री करायचे.” १६ एप्रिल रोजी राहुल गांधी कर्नाटकमध्ये आले असताना खरगे यांनी हे वक्तव्य केले.
सिद्धरामय्या यांचे आणखी एक सहकारी झमिर अहमद यांनाही शिवकुमार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अहमद यांनी नुकतेच वक्तव्य केले होते, “फक्त एका समुदायाचा पाठिंबा असलेला नेता कर्नाटकचा मुख्यमंत्री बनू शकत नाही.” अहमद यांचे वक्तव्य शिवकुमार यांची खिल्ली उडविणारे होते. यानंतर सूरजेवाला यांनी अहमद यांना जाहीर खडेबोल सुनावले.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना वेगवेगळ्या भागांत स्वतंत्र प्रचार करण्याचे निर्देश दिले होते. दोघांमध्ये कोणतेही शाब्दिक युद्ध रंगणार नाही, याची काळजी पक्षाने घेतली होती. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांमधील वाद हा जुना असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. ३ ऑगस्ट २०२२ रोजी सिद्धरामय्या यांनी आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशाल मिरवणूक काढून मीच राज्यातील मोठा नेता असल्याचे दाखवून दिले होते. या मिरवणुकीला राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते. सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, राहुल गांधींच्या उपस्थितीमुळे सिद्धरामय्या यांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होते.
शिवकुमार हे कर्नाटकाच्या दक्षिण भागातील जिल्ह्यामधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. या भागातून वोक्कालिगा समुदायाने जर काँग्रेसला मतदान केले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास ते मतदारांना देत आहे. कर्नाटकमधील प्रभावशाली असलेल्या वोक्कालिगा समुदायातून शिवकुमार येतात. काँग्रेसमध्ये सध्या शिवकुमार यांचे नाणे खणखणीत वाजत असले तरी शिवकुमार पूर्ण ताकदीनिशी स्वतःला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पुढे आणत नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्यावर सुरू असलेले अनेक खटले. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच प्राप्तिकर विभागाकडूनही त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सध्या न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला आहे.
काँग्रेसमधील काही धुरीणांच्या मते, भाजपामधून आलेल्या मातब्बर लिंगायत नेत्यांमुळे या दोन नेत्यांच्या कम्पूमधील जे संतुलन आहे, ते कधीही बिघडण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाच्या मतपेटीला काबीज करण्यासाठी, काही समाजापर्यंत पोहोचण्यासाठी, काँग्रेस स्वतःच्या मतपेटीशी तडजोड करीत असल्याचेही काहींचे मत आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार लहर सिंह म्हणाले की, राहुल गांधी हे नेहमी जातीविरहित राजकारणाची बढाई मारत असतात. भाजपामधील मोठे लिंगायत नेते पक्षात घेतल्यानंतर तुमच्या वोक्कालिगा, कुरुबा आणि दलित नेत्यांचे काय होणार?