सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी वेगवेगळे पक्ष आणि उमेदवार जनतेला मोठमोठी आश्वासनं देत आहेत. प्रचारसभा, सेलिब्रेटींच्या प्रचारफेऱ्या, आश्वासनं, जाहिरातींच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही ठिकाणी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात उमेदवार आणि नेते आचारसंहितेचं उल्लंघन करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार कर्नाटकच्या बेळगावी येथे घडला आहे.
बेळगावी जिल्ह्यातील कागवाडचे काँग्रेसचे आमदार राजू केज यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. केज यांनी कर्नाटकच्या जुगुलतोमधील एका प्रचारसभेत मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आमदार केज मतदारांना म्हणाले, तुम्ही आमच्या पक्षाला मोठ्या बहुमताने जिंकवलं नाही तर आम्ही तुमच्या घरांचा वीजपुरवठा बंद करू.
राजू केज म्हणाले, “तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर आम्ही तुमची वीज बंद करू आणि मी माझ्या शब्दांवर ठाम आहे.” राजू केज यांनी याआधीदेखील अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. केज यांनी मंगळवारी (३० एप्रिल) एका प्रचारसभेत पंतप्रधानांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आमदार केज म्हणाले की, “१४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोणी पंतप्रधान होणार नाही का? अनेक तरुण म्हणतायत की, मोदी तर मोदी आहे. अरे पण तुम्ही त्यांच्यामागे लाळ गाळत का फिरताय?” यापूर्वी ममदापूरमधील एका प्रचारसभेला संबोधित करताना केज म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप आलिशान आयुष्य जगतात.
हे ही वाचा >> “राज ठाकरे म्हणाले होते दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, आता…”, ठाकरे गटाचा सवाल
काँग्रेस आमदार राजू केज यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांच्यावर आणि काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, या काँग्रेसकडे ‘मोहब्बत की दुकान’ नाही. ते तर ‘धमकीचे भाईजान’ आहेत. शहजाद म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मागील निवडणुकीत मतदारांना इशारा दिला होता की, मतदारांनी त्यांच्या भावाला मतं दिली नाहीत तर त्यांची कामं (विकासकामं) केली जाणार नाहीत.