Kasba Peth Assembly Election : कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाचं पारडं जड? मविआ अन् महायुतीमधून कोणाला मिळणार संधी?

Kasba Peth Assembly Election : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता कसबा विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Kasba Peth Assembly Election
कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाचं पारडं जड?, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kasba Peth Assembly Election : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे मतदारसंघातील दौरे वाढले आहेत, तर सर्वच राजकीय पक्षांकडून कामाचा आढावा घेतला जात आहे. खरं तर २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. याचं कारण म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांत राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलेला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता कसबा विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या कसबा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत घडामोडी सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

खरं तर कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मनला जायचा. २८ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व राहिले. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट आणि २०१९ मध्ये मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र, २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळवला होता.

आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून राज्यभरात आचारसंहिता लागू झालेली आहे. आता उमेदवारांच्या याद्याही जाहीर होतील. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. महायुतीमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघामधून अनेक जण उत्सुक आहेत, तर महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यासह अजूनही काही जणांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात चांगलंच आव्हान निर्माण झालं आहे.

मतदारांची संख्या

कसबा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीतील आकडेवारीनुसार, एकूण २,९०,४८४ पात्र मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १,४४,०३४ तर महिला मतदारांची संख्या १,४६,४४६ एवढी आहे. आता या आकडेवारीत बदल झालेला असू शकतो.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kasba peth assembly election 2024 bjp vs congress mahavikas aghadi mahayuti ravindra dhangekar politics gkt

First published on: 21-10-2024 at 18:52 IST
Show comments