Assembly Election Exit Poll : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले. या दोन्ही राज्यातील निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र यापूर्वी टीव्ही वृत्तवाहिन्या आणि काही संस्था निवडणूक निकालांचे अंदाज (Exit Poll) जाहीर करतात. मतदानाची वेळ संपल्याबरोबर काही वेळातच हे अंदाज जाहीर केले जातात. मतदान झाल्यानंतर अनेकांना निवडणुकीचा नेमका निकाल काय असेल? याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. असे बरेच जण या एक्झिट पोलकडे डोळे लावून बसलेले असतात. पण हे एक्झिट पोल किती खरे ठरतात? आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेले एक्झिट पोल कितपत अचूक ठरले होते? याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपाने १०५ जागांवर विजय मिळवला होता. तर विभाजन न झालेल्या शिवसेनेला (Shivsena) ५६ आणि विभाजन न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला ५४ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने या निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या.
महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज काय होते?
इंडिया टुडे-अॅक्सिसने १६६ ते १९४ जागा या एनडीए (शिवसेना आणि भाजपा) आणि ७२ ते ९० जागा या यूपीए म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.
न्यूज१८-आयपीएसओएसने २४३ जागा या एनडीएला मिळतील आणि ४१ या यूपीएला मिळतील असा अंदाज त्यांच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला होता.
रिपब्लिक-जन की बात यांनी २१६ ते २३० जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होतील आणि ५२ ते ५९ जागांवर यूपीएच्या उमेदवारांना विजय मिळेल असे म्हटले होते. तर टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये २३० जागा या एनडीए तर ४८ जागा या यूपीएला मिळतील असे म्हटले होते.
तर एबीपी न्यूज-सी व्होटरने २०४ जागा या एनडीएला आणि ६९ जागा यूपीएला मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.
झारखंड विधानसभा निवडणूक एक्झिट पोल
झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक २०१९ ही नोव्हेंबर ३० ते डिसेंबर २० या दरम्यान पार पडली होती. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांनी मिळून बनलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)ने ही निवडणूक जिंकली होती. तर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने या निवडणुकीत सर्वाधिक ३० जागा जिंकल्या होत्या. भाजपाला २५ जागांवर आणि काँग्रेसला १६ जागांवर विजय मिळाला होता.
द इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये जेएमएम-काँग्रेसच्या आघाडीला सर्वात जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता. या एक्झिट पोलनुसार यूपीए ४३ जागा तर भाजपाला २७ जागा मिळतील असे सांगण्यात आले होते.
एबीपी-व्होटरने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल अंदाज वर्तवला होता. त्यांच्या एक्झिट पोलनुसार यूपीएला ३५ जागा तर भाजपाला ३२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
टाइम्स नाऊने ४४ जागा या यूपीएला आणि २८ जागा या भाजपाला मिळतील असे त्यांच्या एक्झिट पोलमध्ये सांगितले होते.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ च्या एक्झिट पोलमध्ये बहुतांश टीव्ही वृत्तवाहिन्यांनी काँग्रेसच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज देखील सपशेल खोटा ठरला. या निकालानंतर अनेकांना झटका बसला होता. यानंतर राजकीय पक्षांनी मतमोजणीच्या प्रक्रियेवर प्रश्न देखील उपस्थित केले होते.