कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यानंतर काँग्रेसच्या या विजयाची देशभरात चर्चा आहे. या विजयाचं श्रेय काँग्रेस नेते राहुल गांधींपासून कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यापर्यंत अनेकांना दिलं जात आहे. अशातच कर्नाटक निवडणुकीची रणनीती ठरवण्यात पडद्यामागून काम करणाऱ्या एका व्यक्तीचीही सध्या चर्चा सुरू आहे. या व्यक्तीचं नाव आहे निवडणूक रणनीतीकार सुनिल कनुगोलू. सुनिल कनुगोलू कोण आहेत? त्यांच्या कामाचा अनुभव आणि या निवडणुकीतील भूमिका काय याचा हा आढावा…
कोण आहेत सुनिल कनुगोलू?
सुनिल कनुगोलू मुळचे कर्नाटकमधील बेल्लारीचे रहिवासी आहेत. बेल्लारीच्या नावाजलेल्या घरातून ते येतात. त्यांचा जन्म चेन्नईत झाला आणि बालपणही तेथेच गेले. त्यांनी अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतलं आहे. त्यानंतर मॅकिन्सी या जागतिक व्यवस्थापन कंपनीत त्यांनी काम केलं. भारतात परत आल्यावर त्यांनी निवडणूक रणनीतीचं काम केलं.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काम
सुनिल कनुगोलू यांनी भारतात आल्यावर असोसिएशन ऑफ बिलियन माईंड्स कंपनीचं नेतृत्व केलं. याच कंपनीने तेव्हा गुजरात विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काम करणाऱ्या रणनीतीकारांमध्येही त्यांचा समावेश होता. २०१७ मध्ये कनुगोलू यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणनीतीही आखली.
एम. के. स्टॅलिन यांच्या प्रचारासाठी खास मोहीम
२०१९ लोकसभा निवडणुकीत कनुगोलू यांनी एम. के. स्टॅलिन यांच्या प्रचारासाठी खास मोहीम राबवली. यावेळी डीएमकेच्या नेतृत्वातील आघाडीला ३९ पैकी ३८ जागांवर विजय मिळाला होता. यानंतर एकेकाळचे त्यांचे सहकारी प्रशांत किशोर यांनी स्टॅलिन यांची निवडणूक रणनीती हातात घेतल्यावर ते स्टॅलिन यांचं काम थांबवून बंगळुरूला आले. २०२१ मध्ये त्यांनी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या प्रचारासाठी रणनीती आखली. यावेळी पलानीस्वामींच्या पक्षाला ७५ जागांवर विजय मिळाला.
हेही वाचा : कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपाचा दारूण पराभव, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला वाटतं…”
जन्मभूमी कर्नाटकात यशस्वी निवडणूक रणनीती
या प्रवासानंतर मागील वर्षी सुनिल कनुगोलू यांनी काँग्रेसच्या प्रचार रणनीतीचं काम सुरू केलं आणि पहिलीच निवडणूक त्यांच्या जन्मभूमी कर्नाटकात सांभाळली. कर्नाटकमधील या विजयानंतर सुनिल कनुगोलू यांची जोरदार चर्चा आहे. मात्र, ते स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणं पसंत करत असल्याचंही बोललं जातं.