भारतीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह देशभरातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये यावेळी चुरशीची लढत होणार असं चित्र आहे. अशातच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मौर्या यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून मुलाखत घेणाऱ्या पत्रकारावर थेट विशेष समुदायाचा ‘एजंट’ असल्याचा आरोप केला आणि कॉलर माईक काढून टाकत मी तुमच्याशी बोलणार नाही असं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

बीबीसी हिंदीच्या पत्रकारांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना हरिद्वार आणि रायपूरमधील धर्मसंसदेत मुस्लिसांच्या नरसंहाराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. तसेच आयआयएमच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी याच प्रश्नावर पंतप्रधान मोदींना चिट्ठी लिहून या वक्तव्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केल्याचंही पत्रकारांनी मौर्य यांना लक्षात आणून दिलं.

“धर्माचार्यांना आपल्या मंचावरून त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार”

यावर मौर्य म्हणाले, “भारतीय जनता पार्टीला कोणतंही प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. आमचा ‘सबका साथ, सबका विकास’मध्ये विश्वास आहे. धर्माचार्यांना आपल्या मंचावरून त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. तुम्ही हिंदू धर्मगुरूंवरच का बोलता? इतर धर्मगुरूंनी काय वक्तव्य केलंय त्यावर का बोलत नाहीत? ३७० हटण्याआधी जम्मू काश्मीरमधून किती लोकांना पलायन करावं लागलं त्यावर का बोलत नाही? धर्मसंसद भाजपाची नाही, ती संतांची आहे. संत आपल्या कार्यक्रमात काय बोलतात हा त्यांचा अधिकार आहे.”

अशी वक्तव्य करून काही लोक जातीय-धार्मिक द्वेषाचं वातावरण तयार करतात असं निरिक्षण पत्रकारांनी नोंदवल्यावर मौर्या यांनी असं काहीही होत नसल्याचा दावा केला. तसेच जे त्यांना योग्य वाटतं ते त्यांच्या मंचावर बोलतात असं सांगितलं.

हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचाच पक्षाला रामराम; सपामध्ये केला प्रवेश!

यावेळी मौर्या यांनी मुलाखतीत राजकारणाशी संबंध नसलेले प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला. यानंतरही पत्रकारांनी धर्मसंसदेतील नरसंहाराच्या वक्तव्यांवर प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री मौर्य संतापले. तसेच त्यांनी मुलाखतकाराला विशेष लोकांचे ‘एजंट’ असल्याप्रमाणे प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला. तसेच आपला कॉलर माईक काढून मी तुमच्याशी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why up deputy cm keshav prasad maurya remove collar mike and called journalist agent while interview pbs