Kopari Pachpakhadi : कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!

एकनाथ शिंदेंसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे, तर ठाकरेंनाही या जागेवर आपलं नेतृत्त्व उभं करायचं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय खेळी करत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली.

Kedar Dighe and Eknath Shinde
एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे लढत रंगणार (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

CM Eknath Shinde in Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम ग्राऊंड असलेल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. या मतदारसंघातून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोपरी पाचपाखाडीतून सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार आहे. केदार दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना येथे टफ फाईट मिळणार आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. सत्ताधारी शिवसेनेत फूट पडली. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपाशी सूत जुळवलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. न्यायालयीन लढाईत त्यांनी पक्षचिन्ह आणि पक्षनावावर हक्कही मिळवला. यामुळे राजकीय इतिहासातील ही सर्वांत मोठी फूट मानली जातेय. या फुटीमुळे फक्त दोन गट निर्माण झाले नाहीत तर राज्याच्या राजकारणात मोठं वैर निर्माण झालं आहे. यामध्ये एकनाथ शिंदे कायम मध्यवर्ती राहिले. त्यामुळे राजकीय पटलावरून एकनाथ शिंदेंना नामोहरण करण्याकरता केदार दिघेंचा हुकमी एक्का बाहेर काढला आहे.

हेही वाचा >> Uddhav Thackeray First List : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा हुकमी एक्का!

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ २००९च्या आधी ठाणे शहर मतदारसंघात येत होता. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोपरी पाचपाखाडी हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदेंनी या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा समर्थक वर्ग याच मतदारसंघात राहतो. त्यामुळे या दोन्ही समर्थकांची मते मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मिळत असतं. परंतु, आताच्या राजकीय स्थितीनुसार येथला मतदारवर्गही विभागला आहे.

मविआ आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची जागा

एकनाथ शिंदेंसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे, तर ठाकरेंनाही या जागेवर आपलं नेतृत्त्व उभं करायचं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय खेळी करत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली. एकीकडे आनंद दिघे यांचे शिष्य तर दुसरीकडे आनंद दिघे यांचे कुटुंबीय अशा पेचात सापडलेले मतदार कोणाला मते देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दोन टर्ममध्ये किती मते मिळाली होती?

२०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांना १ लाख मते मिळाली होती. तर, भाजपाचे संदीप लेले आणि काँग्रेसचे मोहन तिवारी यांचा मोठ्या फरकाने त्यांना पराभव केला होता. तर, २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना १ लाख १३ हजार मते मिळाली होती. तर, काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने धोबीपछाड केला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kopari pachpakhadi vidhansabha constituency cm eknath shinde vs kedar dighe fight sgk

First published on: 23-10-2024 at 20:51 IST
Show comments